⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | केळी उत्पादक शेतकरी संकटात; शेतकऱ्यांची लूट, प्रशासनाचे दुर्लक्ष

केळी उत्पादक शेतकरी संकटात; शेतकऱ्यांची लूट, प्रशासनाचे दुर्लक्ष

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगावची केळी जगभर प्रसिद्ध असून कोरोना आणि अवकाळीच्या संकटातून बाहेर पडलेला केळी उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. शासन दरबारी केळीला १०६० चा भाव असला तरी प्रत्यक्षात मात्र ५०० ते ६०० रुपये प्रमाणे केळी खरेदी केली जात आहे. लागवडीची रक्कम देखील निघेनाशी झाल्याने केळी उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला आहे. जिल्ह्यातील बळीराजा संकटात असताना देखील जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नसून ते व्यापाऱ्यांच्या बाजूने आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हा हा केळी उत्पन्नासाठी प्रसिद्ध असून जळगावची केळी रेल्वे वॅगनने परदेशात देखील निर्यात केली जाते. गेल्यावर्षी कोरोनामुळे केळीची बाजारपेठ थंडबस्त्यात होती तर यावर्षी सुरुवातीला पाऊस नसल्याने आणि नंतर अवकाळी पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना संकटात आणले. जळगाव जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी केळी आणि कापसाचे उत्पादन घेतात. यावर्षी देखील केळीची हजारो हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आज संकटात सापडला आहे. केळीला शासन दरबारी १०६० रुपये भाव मिळाला आहे. शासनाच्या भावाप्रमाणे आपल्याला कमी अधिक करून १ हजारपर्यंत रक्कम निश्चितत मिळेल अशी आशा लावून जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी बसलेला होता. सध्या ग्रामीण भागातील परिस्थिती लक्षात घेता व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. आज केळीचे भाव १०६० रुपये असून सुद्धा शेतकऱ्याला प्रत्यक्षात ५०० ते ६०० रुपये दराप्रमाणे केळी व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जात आहे.

शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये सुरु असलेल्या भावाच्या खेळीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सध्या तरी लक्ष घेतलेले दिसून येत नाही. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने केळी लागवडीचा खर्च भागवणे ही अशक्य झाले आहे. केळीला योग्य भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ शकते. अगोदरच कर्जबाजारी असलेला शेतकरी केळीला भाव नसल्याने पूर्णतः हताश झाला असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

केळी उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ

केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आज उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आज माझ्या शेतात केळीचे ३ हजार खोड आहेत. शासनाच्या संकेतस्थळावर सध्या १ हजारावर भाव आहे परंतु शेतात माल घेण्यासाठी येणारे व्यापारी ५०० ते ६०० रुपये दराने मागत आहेत. सध्या मालाला भाव नाही, मोठे व्यापारी माल खरेदी करीत नाही, अशी कारणे ते देत असतात. आम्हाला शासनाकडून मदतीची अपेक्षा असून लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.

– गोपाल सुकदेव चौधरी, केळी उत्पादक शेतकरी

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.