⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

अडीच लाख रुद्राक्षांनी अभिषेक केले जाणारे ‘बडे जटाधारी महादेव मंदिर’!

जळगाव लाईव्ह न्यूज । रजत भोळे सध्या पवित्र श्रावण महिना सुरु असून जळगाव लाईव्हच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या महादेव मंदिरांची माहिती आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. गेल्या आठवड्यात शहरातील ओंकारेश्वर मंदिराला भेट दिल्यानंतर आज आपण पाहणार आहोत जळगावातून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर वडनगरी फाटा या ठिकाणी वसलेले बडे जटाधारी महादेव मंदिर. महादेवाचे तसे तर अनेक रूप आहेत त्यातीलच एक जळगाव वासियांना पाहायला मिळते आणि ते म्हणजे बडे जटाधारी महादेव. निसर्गरम्य वातावरणात स्थापना करण्यात आलेल्या या मंदिरात भाविकांना श्रावण मासात प्रसाद व आशीर्वाद स्वरूपात सिद्ध केलेले रुद्राक्ष वाटप केले जातात. चला तर जाणून घेऊया मंदिराची माहिती..

बडे जटाधारी महादेव मंदिर हे जागृत देवस्थान असून येथे भाविकांनी मानलेल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. मंदिर निसर्गरम्य वातावरणात असून येथे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी लागलेली असते. मंदिराच्या सुरवातीलाच मोठा पिंपळाचा वृक्ष आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे त्यानंतर प्रवेश होतो प्रमुख मंदिरात. मंदिराच्या गाभाऱ्यात बडे जटाधारी महादेवाचे सुरेख असे सोनेरी रंगाच शिवलिंग आहे. शिवलिंगावर त्रिपुंड व ओम आहे.

श्रावण मासात या बडे जटाधारी मंदिरात पिंडीवर रुद्राभिषेक केला जातो. यंदा पिंडीवर २१ जोडप्यांच्या हस्ते अडीच लाख रुद्राक्षांचा अभिषेक करण्यात आला. श्रावणात मंदिरात अखंड, हवन, अखंड ज्योत देखील लावली जाते. रुद्राभिषेक केलेले रुद्राक्ष सिद्ध झाल्यावर प्रसाद म्हणून भाविकांमध्ये वाटले जातात. हा रुद्राक्ष मिळवण्यासाठी भाविकांची मंदिरात भलीमोठी रांग लागलेली असते. एका वेळी एकाच भाविकाला रुद्राक्ष मिळत असतो. त्यासाठी आधारकार्ड दाखवणं अनिवार्य आहे.

बडे जटाधारी महादेव मंदिराचा कळस ५१ फूट उंचीचा असून यातील लक्षवेधी बाब म्हणजे या कळसावर बारा ज्योतिर्लिंगाच हि दर्शन होत असते. मंदिरात महाशिवरात्रीला साधारणतः १२ क्विंटलची साबुदाणा खिचडी प्रसादा म्हणून वाटप केली जाते. तसेच रात्री भाविकांना ७०० लिटर दुधाचं वाटप करण्यात येते. संपूर्ण कार्यक्रमासाठी भारत नथ्थू चौधरी यांच्यासह त्यांची मुले जगदीश आणि तुषार व इतर भाविक परिश्रम घेतात.

पहा खास व्हिडिओ :