जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाद्वारे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेदरम्यान मतदान होणार आहे.
त्यानुसार 13 नोव्हेंबर, 2024 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपासून ते 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निकालाचे अंदाज (एक्जीट पोल) प्रसार माध्यमांवर प्रसारीत करण्यास प्रतिबंधीत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार संघासाठी 20 नोव्हेंबर, रोजी मतदान प्रक्रिया होणार तर 23 नोव्हेंबर, 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार बुधवार, दि. 13 नोव्हेंबर रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपासून ते बुधवार, दि.20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत या कालावधीत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निकालाचे अंदाज (एक्जीट पोल) प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया, दूरदर्शन, आकाशवाणी अशा सर्व प्रसार माध्यमांवर प्रसारीत करण्यास मनाई करण्यात आली आहे.
त्यासंदर्भात अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.