बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

धरणगाव तालुक्यातील जवानाला कर्तव्यावर असताना वीरमरण

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यातील सुपुत्राला वीरमरण आलं आहे. सैन्यदलात कार्यरत असलेले धरणगाव तालुक्यातील रोटवद येथील जवान विनोद जवरीलाल शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

याबाबत असे की रोटवद येथील विनोद जवरीलाल शिंदे हा तरूण सैन्यदलात जवान म्हणून कार्यरत होता. आज कर्तव्यावर असतांना त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आल्यानंतर परिसरावर शोककळा पसरली.

दरम्यान, जवान विनोद शिंदे यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. याबाबत प्रशासनातर्फे तयारी करण्यात येत आहे. तर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.