जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२५ । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज ३१ डिसेंबर रोजी प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येतेय. मात्र याच दरम्यान भाजपने घेतलेल्या आक्षेपामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक उमेदवारांचे अर्ज धोक्यात आहे. ठाकरे गटाच्या 35 उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत जोडलेल्या एबी फॉर्मवर ‘स्कॅन केलेली सही’ असल्याचा दावा भाजपने केला आहे. हे सर्व अर्ज निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बेकायदेशीर ठरवून रद्द करण्याची मागणी भाजपने केली आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या नियमांनुसार, उमेदवारी अर्जावर संबंधित उमेदवाराची स्वतःच्या हस्ताक्षरातील मूळ स्वाक्षरी असणे बंधनकारक असते. मात्र, जळगावमधील काही प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांनी अर्जावर डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक सहीचा वापर केला आहे, असा दावा भाजपने केला आहे. या संदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, हे नियमबाह्य अर्ज तत्काळ रद्द करण्यात यावेत, अशी मागणी लावून धरली आहे.

निवडणूक नियमावलीनुसार, एबी फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत स्वाक्षरी कर्त्याची मूळ स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे. स्कॅन किंवा फोटोकॉपी केलेली सही ग्राह्य धरली जात नाही.भाजपचे उमेदवार अरविंद देशमुख आणि इतर उमेदवारांनी असा आक्षेप घेतला आहे की, ठाकरे गटाच्या 35 उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या एबी फॉर्मवर बॉलपेनने केलेली मूळ सही नसून ती स्कॅन केलेली प्रतिमा आहे.

या वादात केवळ भाजपच नाही, तर शिवसेना (शिंदे गट) देखील आक्रमक झाली आहे. शिंदे गटानेही ठाकरे गटाच्या या ‘स्कॅन’ केलेल्या सह्यांवर आक्षेप नोंदवला असून भाजपच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. अरविंद देशमुख यांनी म्हटले आहे की, “जर नियम सर्वांसाठी सारखे असतील, तर स्कॅन केलेली सही असलेल्या अर्जांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले पाहिजे.”
निवडणूक निर्णय अधिकारी या आक्षेपांवर काय निर्णय घेतात, यावर ठाकरे गटाच्या 35 उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. जर हे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाले, तर जळगाव महापालिकेत ठाकरे गटाला मोठा फटका बसू शकतो आणि भाजप-शिंदे गटाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. 31 डिसेंबरच्या छाननी दरम्यान यावर अंतिम निकाल अपेक्षित आहे.








