जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२६ । जळगाव शहर महापालिका निवडणुकीसाठी १९ प्रभागांतील ७५ जागांसाठी इच्छुकांनी मंगळवारअखेर दाखल केलेल्या तब्बल १०३८ अर्जांपैकी बुधवारी (दि. ३१) १३५ अर्ज छाननीत बाद ठरविण्यात आले. तर ९०३ अर्ज वैध ठरले आहेत. दुसरीकडे प्रभाग १२ ‘ब’ या ओबीसी महिला राखीव जागेवर उमेदवारी अर्जाच्या तांत्रिक पडताळणीनंतर भाजपच्या उमेदवार उज्ज्वला बेंडाळे यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रशासनावर प्रचंड ताण होता. निवडणूक कर्मचाऱ्यांचे पथक पहाटे २:३० वाजेपर्यंत कार्यरत होते. पुन्हा बुधवारी सकाळी ९ वाजता पुन्हा छाननी प्रक्रियेसाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी हजर झाले.रात्री उशिरापर्यंत छाननीचे काम सुरूच होते.अर्जाची छाननी प्रक्रिया सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.

छाननीत प्रभाग १३ सर्वात चर्चेत राहिला. या प्रभागात सर्वाधिक १०३ उमेदवारांनी नशीब आजमावण्यासाठी अर्ज भरले होते. मात्र, छाननीअंती यातील सर्वाधिक म्हणजेच ४७अर्ज अवैध ठरले आहेत. आता या प्रभागात ५६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापाठोपाठ प्रभाग ३ मध्ये २९ आणि प्रभाग ८ मध्ये २५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. प्रभाग ५, ६ आणि ११मध्ये उमेदवारांनी अत्यंत सावधगिरीने अर्ज भरल्याचे दिसून आले. या तिन्ही प्रभागांत एकही अर्ज अवैध ठरलेला नाही. प्रभाग ६ मध्ये ५२, प्रभाग ११ मध्ये ५४ आणि प्रभाग ५मध्ये ३६ अर्ज दाखल होते ते सर्व वैध ठरले आहेत.





