विकास महामंडळातर्फे विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन, मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । महाराष्ट्र राज्य् इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे इतर मागावर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना : कर्ज मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत, राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येते. लाभार्थी सहभाग पाच टक्के, महामंडळाचा सहभाग 20 टक्के, बँक सहभाग 75 टक्के. महामंडळ सहभागावर व्याजदर 6 टक्के व परतफेड कालावधी पाच वर्षे.
थेट कर्ज योजना : कर्ज मर्यादा एक लाख रुपये, लाभार्थ्याचा हिस्सा निरंक, परतफेड कालावधी चार वर्षे (मुद्दल दरमहा रुपये 2085, समान मासिक हप्त्यामध्ये), नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही. मात्र, थकीत झालेल्या प्रत्येक हप्त्यावर चार टक्के व्याज दर.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा : कर्ज मर्यादा दहा लाख रुपये, बँकेने दहा लाख रुपये मंजूर केलेल्या प्रकरणात उमेदवाराने कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (बारा टक्केच्या मर्यादेत) त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. परतफेडीचा कालावधी बँक निकषानुसार राहील.
गट कर्ज व्याज परतावा योजना (दहा ते 50 लाख रुपयांपर्यंत) : महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत, भागिदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी, एलएलपी, एफपीओ, शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रकमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून केला जाईल. मंजूर कर्जावर पाच वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर जास्तीत जास्त 12 टक्के व्याजदराच्या आणि 15 लाख रुपयांच्या मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्याच्या आधार लिंक खात्यात दरमहा महामंडळातर्फे जमा करण्यात येईल. (अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरीता आठ लाख रुपयांपर्यंत राहील, नियमित कर्जफेड केली नाही, तर व्याज परतावा दिला जाणार नाही.)
अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरीता एक लाख रुपये, कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा व्यवसथापक, महाबळ कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जळगाव येथे संपर्क साधावा.