जळगाव जिल्ह्यातील ‘या’ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

फेब्रुवारी 24, 2026 5:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील मैट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देय असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत प्रकल्प कार्यालयाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Scholarship jpg webp

जळगाव जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आदिवासी विकास विभागामार्फत विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन २०१८-१९ पासून महाराष्ट्र शासन तर्फे महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल सुरू केले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी http://mahadbtmahait.gov.in⁠ या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

Advertisements

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नवीन व जुने विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयांनी तत्काळ अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. यासोबतच सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित व त्रुटीयुक्त अर्ज तातडीने निकाली काढावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisements

महाविद्यालयांनी शासन निर्णयातील अटी व शर्तींनुसार पात्र अर्जांची तात्काळ पडताळणी करावी. अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी महाडीबीटी पोर्टलवरील मार्गदर्शक सूचना व नियमांचे काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे. त्रुटी पूर्ततेसाठी परत पाठविण्यात आलेले अर्ज सुधारणा करून पुन्हा सादर करणे बंधनकारक राहील.

शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात थेट जमा होत असल्याने विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधारशी जोडणे अत्यावश्यक आहे. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित विद्यार्थी व महाविद्यालय जबाबदार राहतील.

दरम्यान, सन २०२४-२५ मधील ३७० आणि सन २०२५-२६ मधील १५४८ अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असून ते शासन निर्णयाच्या अधीन राहून शक्य तितक्या लवकर निकाली काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या योजनेबाबत सर्व महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर व्यापक प्रसिद्धी करावी, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती मिळून विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज भरता येतील, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now