कृषि पायाभूत सुविधा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ ऑगस्ट २०२१ । कृषि पायाभुत सुविधा योजनेतंर्गत गोडाऊन बांधकाम, कोल्ड स्टोरेज, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, विपणन व वर्गीकरण अशा विविध 150 प्रकारच्या घटकांना लाभ देण्यात येतो. या योजनेतंर्गत कृषि मालावरील प्राथमिक प्रक्रिया घटकांनाच लाभ देता येतो. या योजनेमध्ये बचतगट, विविध संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, वैयक्तिक लाभार्थी, गावातील विविध समुह, शेतकरी गट सहभागी होऊ शकतात.
ही योजना केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असून याची कालमर्यादा 5 वर्षासाठी आहे. या योजनेत कुठल्याही प्रकारचे अनुदान देण्यात येत नसून केवळ कर्जावरील व्याजदरात 3 टक्के सुट दिली जाते. तसेच 2 कोटी रुपयांपर्यंत संबंधीत लाभार्थ्यांची बँक हमी देते. तसेच लाभार्थी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेऊ शकतो.
या योजनेचे पोर्टल Agriinfra.dac.gov.in असुन त्यावर सविस्तर मार्गदर्शक सुचना/महत्वाचे पत्रके, प्रकल्प अहवाल तयारी करण्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पात्र ठरणाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.