जळगाव लाईव्ह न्यूज । देशात वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून याच पार्श्वभूमीवर देशात आणखी एक वंदे भारत ट्रेन सुरु केली जाणार आहे. राजस्थानमधील उदयपूर सिटी ते असरवा (अहमदाबाद) दरम्यान ही नवी वंदे भारत एक्सप्रेस धावणार असून यामुळे दोन्ही राज्यांतील प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. मात्र याचवेळी दोन ट्रेन बंद केल्या जाणार आहेत. याच आठवड्यात दोन वंदे भारत ट्रेन बंद केल्या जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

नवीन ट्रेनचे वेळापत्रक
उदयपुर सिटी-असरवा (अहमदाबाद)- उदयपुर सिटी ट्रेन मंगळवार सोडून आठवड्याचे सहा दिवस धावणार आहे. ही ट्रेन सकाळी ६.१० वाजता उदयपुर सिटी येथून निघणार आहे. ट्रेन १०.२५ मिनिटांनी असरवा येथे पोहचणार आहे. हीच ट्रेन परत असरवा येथून संध्याकाळी ५.४५ वाजता निघणार आहे. ही ट्रेन रात्री १० वाजता पोहचणार आहे. ट्रेन जवार, डुंगारपुर, हिम्मत नगर स्टेशनवर थांबणार आहे. ही ट्रेन १६० किमी ताशी धावणार असून प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

या नव्या सेवेने राजस्थानहून थेट अहमदाबादला जाणे अधिक सुलभ होणार असून व्यापार, उद्योग आणि पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, जळगाव आणि भुसावळ मार्गे नवीन वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. सध्या भुसावळ मार्गे अंजनी-पुणे दरम्यान वंदे भारत ट्रेन धावत आहे. इतर मार्गावरही वंदे भारत ट्रेन सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. भुसावळ हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असून जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी वर्दळ येथे असते. त्यामुळे भुसावळ आणि जळगावमार्गे इतर मार्गावर वंदे भारत सुरु होण्याची प्रतीक्षा आहे





