जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२४ । मक्याच्या भावात मागील काही दिवसापासून वाढ होताना दिसत आहे. चाळीसगावच्या बाजार समितीत गेल्या दीड महिन्यापासून यंदाच्या हंगामातील धान्य विक्रीसाठी दाखल होत आहे. मक्याची सर्वाधिक आवक होत आहे. सद्यस्थितीत मक्याला १७०० ते २२१० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून हमीभावाने मका खरेदीची प्रतीक्षा आहे.
चाळीसगाव तालुक्यात ८१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड केली जाते. यात ६० ते ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर जिरायती व बागायती कपाशीची लागवड केली गेली. या खालोखाल मक्याची लागवड झाली. पर्जन्यमानाची स्थिती चांगली असल्याने मक्याचे पीक चांगलेच बहरले. गत दीड महिन्यांपासून बाजार समितीत दरदिवशी मक्याची चांगली आवक होत आहे.
यंदा भावही चांगले मिळत आहेत. गेल्या काही वर्षात गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे कल वाढला आहे. येथील औद्योगिक वसाहतीत मक्यावर प्रक्रिया करणारा उद्योग कार्यरत असल्याने शेतकऱ्यांना मका विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठही उपलब्ध आहे. सोमवार ते बुधवार या तीन दिवसात चाळीसगाव बाजार समितीत २९ हजार क्विंटल मक्याची आवक झाल्याचे सभापती यांनी सांगितले.
बुधवारी ८०० क्चिटलची आवक झाली असून मक्याला १७०० ते २२१० रुपये प्रतिक्विंटल असे भाव मिळाले. गत वर्षापेक्षा यंदा भाव अधिक आहे. या भावांमध्ये येत्या काही दिवसात वाढ होऊ शकते, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.