Jalgaon : मोबाईलवर सुसाईड नोट लिहून कंत्राटी कर्मचाऱ्याने संपविले जीवन
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील वाघ नगर येथे एक दुखद घटना घडली आहे, ज्यामध्ये डीआरडीओ कार्यालयात काम करणाऱ्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. अनिल हरी बडगुजर (वय ४६, रा.जीवन नगर ह.मु. वाघ नगर जळगाव) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. दरम्यान त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलवर एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.
या नोटमध्ये त्यांनी कार्यालयातील ९ जणांवर गंभीर आरोप करत पैशांची मागणी केल्याचे नमूद केले होते. त्यांनी आरोप केला की कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर कर्मचारी त्यांच्यावर सतत छळ करत होते, ज्यामुळे त्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला.या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान पोलिसांनी तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अनिल बडगुजर हे वाघ नगर येथे एकटेच वास्तव्याला होते. ते जिल्हा परिषदेतील डीआरडीओ विभागातील बचतगट विभागात कंत्राटी पध्दतीने मॅनेजर म्हणून काम करत होते. दरम्यान, दि. २६ जानेवारी रोजी त्यांनी वाघ नगर येथील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून आईवडील व भाऊ यांच्या मोबाईलवर पाठवून दिली होती. सुसाईड नोट वाचून अनिलचे वडील हरी बडगुजर आणि भाऊ अमित बडगुजर हे दोघी तातडीने वाघ नगर येथील राहत्या घरी गेले. पण तोपर्यंत अनिल बडगुजर यांनी आत्महत्या केली होती.
दरम्यान, अनिल याला गेल्या २ वर्षांपासून त्यांच्या विभागातील बचत गटातील महिला व कर्मचारी हे विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होते. या तसेच स्थानिक समितीमध्ये अनिलच्या विरोधात तक्रारही केली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी महिला कर्मचारी यांनी ६ लाखांची मागणी केली. सुरूवातीला ६ लाख रूपये दिले परंतू त्यानंतर तक्रार मागे न घेता पुन्हा ६ लाखांची मागणी केली. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दोषींना अटक करण्यात यावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. प्रकरणात पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.