सशस्त्र क्रांतीची सुवर्णांकित पाने भाग- ५
भारतीयांचे कल्याण व्हावे; असा इंग्रज प्रशासकांचा उद्देश कधीच नव्हता. भारताला लुटून आपल्या इंग्लंड देशाला समृद्ध बनविण्यासाठी त्यांनी असंख्य प्रकारचे अनैतिक, अमानुष तसेच अमानवी अत्याचार करण्यात कुठलीही कसर बाकी ठेवली नव्हती. गौरवशाली इतिहास, शिक्षण-प्रणाली, सामाजिक व्यवस्था आणि स्वदेशी उद्योग-धंद्यांना पूर्णत: नष्ट करण्यासाठी इंग्रजांनी सैन्यबळ, विश्वासघातकी धनी, मोठ्या घराण्यातील राजे, देशद्रोही अधिकारी आणि फितुरांची भरपूर मदत घेतली. सामान्य लोकं; भुकेमुळे, आजारांमुळे किंवा पोलिसांच्या अत्याचारांमुळे मृत्युमुखी पडत असूनही इंग्रज सरकारला त्यांची कसलीही काळजी नव्हती.
इ.स. १८९७ मध्ये महाराष्ट्र; विशेषत: पुण्यात प्लेग हा विनाशकारक रोग पसरला. कित्येक लोकांनी त्यामुळे प्राण गमावले. इंग्रज सरकारने रँड नामक एका कठोर आणि निर्दयी अधिकाऱ्याला यादरम्यान पुण्याचा प्रशासक म्हणून नेमले. या इंग्रज अधिकाऱ्याने पुण्यात येताच, नि:शस्त्र तसेच आजारग्रस्त लोकांना घाबरवून, धमक्या देत ईसाई पंथ स्वीकारण्यासाठी बळजबरी करण्यास सुरूवात केली. घराची पाहणी करण्याच्या बहाण्याने लोकांची संपत्ती जब्त करणे, मंदिरातल्या देवी-देवतांच्या मूर्त्या तोडून घेऊन जाणे आणि कुटुंबातील स्त्रियांसोबत अभद्र व्यवहार करणे, यांसारख्या अनैतिक घटनांनी पुणे व आसपासच्या भागात दहशत पसरली होती.
याच काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या निगराणीखाली गणेशोत्सवासारख्या धार्मिक गतिविधी चालू होत्या. ‘हिंदू संरक्षण सभा’ नामक तरुणांची एक संस्था या गतिविधींचे संचालन करत होती. लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी वर्तमानपत्रात एक लेख लिहिला, ‘‘रोगराई तर केवळ निमित्त आहे. खरं तर सरकार लोकांच्या आत्म्याची अवहेलना करण्याची असुरी वृत्ती बाळगून आहे. रँड अत्याचारी आहे आणि तो इंग्रज सरकारच्याच सांगण्यावरून हे सर्व काही करत आहे. मात्र हे दमनचक्र नेहमीसाठी चालू शकणार नाही. ही रँडशाही लवकरच संपुष्टात येणार.’
याच वर्षी १२ जून १८९७ रोजी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा उत्सव पूर्ण उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वक्त्यांनी स्वत:ला; भारताला स्वाधीन करून घेण्याचा संकल्प केला. छत्रपती शिवाजी महाराजांद्वारे यवन राक्षस अफजल खानाच्या वधाचा ‘महत्कृत्य’ म्हणून उल्लेख केला गेला. तरुणांना सशस्त्र क्रांतीच्या मार्गावर चालण्यासाठी तयार केले जाऊ लागले. या प्रकारे राष्ट्रभक्तीपूर्ण कार्यक्रमांचा मराठी तरुणांवर
प्रभाव पडत होता.
लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाने तसेच आशीर्वादाने काही तरुणांनी अत्याचारी रँडला यमसदनीं पाठवण्याची योजना आखली. वित्त-नियोजन सुद्धा टिळकांच्या सहयोगातूनच झाले. याच दिवसांत दामोदर हरी चाफेकर नामक एक नवतरुण; एका क्लबद्वारे तरुणांना राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि स्वातंत्र्य यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचे धडे देण्याचे काम करीत होता. गंभीरपणे विचार विमर्श करून दामोदर चाफेकरांवर रँडच्या वधाची जबाबदारी सोपविण्यात आली.
पुण्यात २२ जून रोजी; इंग्रज सरकारने भव्य आयोजन करून महाराणी विक्टोरियाचा राज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी रँडला मृत्युलोकीं पोहचवून रँडशाहीचा निरोप घेण्याचे निश्चित झाले. दामोदर चाफेकरांचे धाकटे बंधू; बाळकृष्ण चाफेकर यांनीही या कामात आपल्या मोठ्या भावाला पूर्णत: आधार देण्याचा निश्चय केला. दामोदर चाफेकरांद्वारे भिडे नामक आपल्या एका जवळच्या मित्राला समारोहाच्या ठिकाणीं देखरेख करण्याचे अवघड काम सोपविण्यात आले. त्याने हे काम अत्यंत कुशलतेने पार पाडले.
महाराणी विक्टोरियाचा राज्याभिषेक सोहळा पूर्ण जल्लोषात साजरा करण्यात आला. रात्रभर हे इंग्रजी नाटक चालू राहिले. दोन्ही चाफेकर बंधू हा कार्यक्रम संपण्याची वाट पाहत होते. कार्यक्रम संपल्यानंतर रँड आपल्या सजवलेल्या टांग्यात बसून आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाला. थोडंसं दूरपर्यंत आल्यावर रस्त्यालगतच्या झाडांमागे लपलेले दामोदर चाफेकर बाहेर आले आणि त्यांनी टांग्याच्या दिशेने झेप घेत, टांग्यात बसलेल्या रँडवर दोन ते तीन पिस्तुलीच्या गोळ्या झाडल्या. आपले काम करून दामोदर आरामात गायब झाले. रँडच्या टांग्यामागून आणखी एक कुख्यात इंग्रज अधिकारी एम्हर्स्ट देखील आपल्या टांग्याने घरी जात होता. या राक्षसाला बाळकृष्ण चाफेकरांनी गोळ्या घालून ठार केले. दामोदरांचे धाकटे बंधू देखील आपल्या वाट्याचे काम करून गुपचूपपणे पळून जाण्यात यशस्वी झाले. या दोन्ही बंधूंना अटक करण्यासाठी सरकारने अथक प्रयत्न केले. जेव्हा प्रशासन यामध्ये अयशस्वी ठरले, तेव्हा या दोन्ही बंधूंना पकडून देणाऱ्याला २० हजार रुपये बक्षीस स्वरूपात देण्याची घोषणा केली गेली. इंग्रज सरकारची हीच प्रशासकीय नीती होती; देशभक्तांना फाशी देणे आणि देशद्रोहींना पुरस्कार देणे!
या दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज जयंती व गणेशोत्सवासारख्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनातून तरुणांना एकत्र आणून, सशस्त्र क्रांतीसाठी त्यांना तयार करणाऱ्या लोकमान्य टिळकांना, सरकारने रँड आणि एम्हर्स्टच्या हत्येसाठी जबाबदार ठरवत अटक करून कारागृहात टाकले. टिळकांच्या अटकेमुळे तरुणांमध्ये आधीपासूनच जळणारी क्रांतीची आग आता आणखी प्रखरतेने जळू लागली. जगजाहीर आहे, कि ‘लोकमान्य’ पदवीद्वारे सम्मानित करण्यात आलेले बाळ गंगाधर टिळक; सशस्त्र क्रांतीचे केवळ समर्थकच नव्हते, तर ते तरुणांना क्रांतीच्या मार्गावर चालण्यात अनेक प्रकारची मदतही करीत असत.
तिकडे २० हजारांच्या मोबदल्यात आपला स्वाभिमान विकणारे सक्रिय झाले. याच फितुरांपैकी एक होता; गणेश शंकर द्रविड. याचा भाऊ बाळकृष्ण चाफेकरांचा मित्र होता. द्रविड भावंडांना रँडच्या हत्येमागील सगळे रहस्य माहीत होते. त्या दोघांनी स्थानिक पोलीस अधिकारी ब्रुइनला सगळी माहिती देऊन बक्षिसाची रक्कम मिळवली. त्या काळात आपल्या देशाची अत्यंत वाईट परिस्थिती होती. एकीकडे देशासाठी आपले जीवन त्यागणारे दोन भाऊ होते तर दुसरीकडे इंग्रजभक्त दोन फितूर भावंडं!
दामोदर चाफेकरांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात सादर केले. या क्रांतीकारक देशभक्ताने स्वाभिमानपूर्वक; आपल्यावर असलेल्या सर्व आरोपांचा निर्भयपणे सहर्ष स्वीकार केला. दामोदर चाफेकरांनी न्यायालयात खडे बोल सुनावले. ते म्हणाले, “कि निरपराध भारतीयांवर केल्या जाणाऱ्या अत्याचारांचा प्रतिकार करण्यासाठी, अत्याचारी रँडला शिक्षा देण्याच्या हेतूने मी त्याचा वध केला; जेणेकरून कित्येक देशवासी यातून प्रेरणा घेऊन क्रांतीच्या मार्गावर चालण्यासाठी तयार होतील.”
१८ एप्रिल १८९८ रोजी दामोदर चाफेकरांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. लोकमान्य टिळकांद्वारे पाठवलेली श्रीमद्भगवतगीता हातात घेऊन, दामोदर स्वत:च तुरुंगातील कत्तलखान्याच्या दिशेने चालत गेले आणि गीतेच्या श्लोकांवर बोलत-बोलत हा वीर क्रांतिकारक स्वर्गाच्या वाटेवर निघून गेला. याप्रकारे, एका वीरमातेच्या थोरल्या सुपुत्राने; भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या छातीवर प्रहार करून हौतात्म्य पत्करले.
याच वीरमातेचा दुसरा सुपुत्र बाळकृष्ण; एम्हर्स्टची हत्या केल्यानंतर हैद्राबादकडे पळून गेला आणि भुकेल्या, तहानलेल्या अवस्थेत जंगलात भटकत राहिला. काही दिवसांनी लोकमान्य टिळकांनी या क्रांतिकारक देशभक्ताच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था लावून दिली. बालकृष्ण चाफेकरांचा जीव या व्यवस्थेदरम्यान भूमिगत राहून कोंडल्या जाऊ लागला. या कंटाळवाण्या आयुष्यातून सुटका होण्यासाठी ते गुपचूप महाराष्ट्र परत आले. काही दिवसांनंतर महाराष्ट्राच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. यावर न्यायालयामध्ये अत्यंत नाटकीय स्वरूपात कायदा-प्रक्रिया चालत राहिली.
वीरमातेचा १८ वर्षांचा तिसरा सुपुत्र; वासुदेव चाफेकर सुद्धा भारतमातेला साखदंडापासून मुक्त करण्यासाठी हौतात्म्य पत्करण्याकरिता तयार झाला. तो आपल्या आईजवळ या पवित्र कार्यासाठी परवानगी घ्यायला गेला. कल्पना करा त्या वीरमातेच्या मनःस्थितीची, जिच्या एका मुलाने देशासाठी हौतात्म्य पत्करले, दुसरा मुलगा सुद्धा त्याच वाटेवर आहे आणि आता तिसरा मुलगा देखील देशासाठी बलिदान करण्याकरिता आईच्या आदेशाची वाट बघत, तिच्यासमोर उभा आहे. त्या वीरमातेने आपल्या वात्सल्यरूपी भावनांना नियंत्रित करून, मुलाच्या माथ्याचे चुंबन घेतले आणि डोळ्यांमधील अश्रुपूर्ण प्रेमभावनेने त्याला या अतिकठीण महत्कार्यासाठी परवानगी दिली.
दामोदरांचा तिसरा भाऊ; वासुदेव चाफेकर याने साठे आणि रानडे या आपल्या दोन मित्रांच्या साहाय्याने त्या दोन्ही द्रविड भावंडांना संपविण्याचा निश्चय केला, ज्यांनी दामोदर चाफेकरांना पकडून देऊन बक्षिसाचे २० हजार रुपये मिळवले होते. हे दोन्ही देशद्रोही भाऊ; बक्षिसस्वरूपात मिळालेल्या रकमेतून मौज मजा करत जीवन जगत होते. वासुदेव चाफेकर आणि त्याचे दोन मित्र; या दोन्ही फितुरांच्या दिनक्रमावर बारीक नजर ठेवून होते. एका दिवशी दोन्ही द्रविड भाऊ एका मंदिराच्या मागील बागेत पत्ते खेळतांना आढळले. त्यांना ठार मारण्याची हीच योग्य संधी होती. त्या दोघांना यमसदनीं धाडण्याची वाट पाहणारा वासुदेव भिकाऱ्याच्या वेशात आला आणि द्रविड भावंडांना सांगितले, कि त्यांना तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये बोलावण्यात आले आहे. दोन्ही द्रविड भावंडं मंदिराच्या मुख्य दरवाजातून बाहेर निघालेच होते; इतक्यात त्यांची वाट पाहणाऱ्या साठे, रानडे आणि वासुदेव चाफेकर यांनी त्या दोन्ही भावंडांना गोळ्या घालून ठार केले.
ही हत्या इतक्या चातुर्याने करण्यात आली, कि कुणालाही या कथित हत्याऱ्यांबाबत एक सुद्धा पुरावा मिळाला नाही. या हत्येनंतर वासुदेव चाफेकर, रानडे आणि साठे मोकळ्या वातावरणात फिरत राहिले. तिकडे बाळकृष्ण चाफेकरांवर न्यायालयात हत्येचा खटला चालू होता. असंख्य प्रयत्नांनंतर देखील सरकारला कुणीही साक्षीदार किंवा ग्वाही देणारा सापडला नाही. एक विचारपूर्वक कट रचून सरकारने वासुदेव चाफेकरलाच मोठ्या रकमेचे अमिष दाखवत, आपल्या भावाच्या विरोधात ग्वाही देण्याचा भेकड प्रयत्न केला; मात्र सरकारला याची कल्पना नव्हती, कि हे तिघेही बंधू आपल्या वीरमातेचा आशीर्वाद घेऊन देशासाठी बलिदान देण्याकरिता घरातून बाहेर पडले होते.
वासुदेव चाफेकरला फितुरीच्या रस्त्यावर चालण्यासाठी प्रवृत्त करण्याकरिता रोज पोलीस ठाण्यात बोलाविले जायचे. एका दिवशी एका
पोलीस अधिकाऱ्याने वासुदेव चाफेकरासमोर या तिघांचा अपशब्दांद्वारे अपमान केला. एवढेच नव्हे; तर त्या अधिकाऱ्याने भारताला ‘गुलामांचा देश’ असे संबोधून लोकमान्य टिळकांसारख्या प्रखर राष्ट्रवादी नेत्याबद्दलही शिवीगाळ केली. आपल्या गुरूंचा तसेच देशाचा अपमान या युवा क्रांतिकारकाला सहन झाला नाही. त्याने त्वरित आपल्या खिशातून पिस्तुल काढली आणि त्या अधिकाऱ्याला तिथेच गोळ्या घालून ठार केले. त्यामुळे वासुदेव चाफेकर सुद्धा पोलिसांच्या तावडीत सापडला.
न्यायालयात हा १८ वर्षाचा तरुण देशभक्त; छाती ठोकून आपल्यावरील कथित आरोपांचा स्वीकार करत म्हणाला, “मी देशद्रोही द्रविड भावंडांना सुद्धा माझ्या थोरल्या देशभक्त बंधूंसोबत केल्या गेलेल्या विश्वासघाताची शिक्षा देण्याकरिता ठार मारले आहे. मी आपल्या बंधूच्या विरोधात ग्वाही देण्याचे खालच्या दर्जाचे काम कधीच करू शकत नाही. त्याऐवजी मी हसत-हसत फासावर चढत आपले बलिदान देईन.”
क्रूर न्यायालयाच्या आदेशानुसार बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मोठे बंधू; दामोदर चाफेकर आधीच फासावर चढले होते. इतिहासाची पाने हजार वेळां चाळूनही देशासाठी बलिदान देण्यासारखा असा सुवर्णांकित अध्याय मिळणे; अशक्य आहे. साखळदंडाने बंदीस्त असलेल्या भारतमातेला मुक्त करण्यासाठी एका वीरमातेने आपल्या तिन्ही तरुण सुपुत्रांना औक्षण करून फासावर जाण्याची परवानगी दिली.
या तिन्ही चाफेकर बंधूंच्या बलिदानामुळे देशाच्या तरुणाईला तीव्र धक्का बसला. क्रांती-शिरोमणी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या तरुणांनी बलिदानाच्या या अमर गाथेतूनच प्रेरणा घेतली. देशाच्या प्रत्येक काना-कोपऱ्यातून इंग्रजांना धारातीर्थी पाडण्याचे गगनभेदी स्वर ऐकू येऊ लागले. सशस्त्र क्रांतीची आग शतपटीने तीव्र झाली. या क्रांतीगाथेचा आणखी एक महत्वपूर्ण परिणाम असाही झाला, कि देशभक्त क्रांतिकारकांना पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या आणि न्यायालयात त्यांच्या विरोधात ग्वाही देणाऱ्या नीच देशद्रोहींना मृत्युदंड देण्याची परंपरा सुरू झाली.
क्रमश:
– नरेंद्र सहगल
पूर्व संघप्रचारक, लेखक, पत्रकार
बंधुंनो! माझी आपल्याला सविनय विनंती आहे, कि या लेखनमालेला समाज माध्यमाच्या प्रत्येक साधनाद्वारे सतत पुढे पाठवून आपण सुद्धा फाशीच्या दोरखंडाला निवडणाऱ्या देशभक्त क्रांतिकारिकांना आपली श्रद्धांजली देत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. विसर न पडो, चूक न घडो!