⁠ 
शुक्रवार, मार्च 1, 2024

पंतप्रधान मोदींच्या आधीच अमित शाह जळगाव दौऱ्यावर येणार ; असे आहेत नियोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । 11 फेब्रुवारी 2024 । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींचे दौरे वाढले असून याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर येणार असल्याचं सांगितले जात आहे. साधारणपणे फेब्रुवारीच्या उत्तरार्धात मोदींचा दौरा असेल असे मानले जात होते. मात्र, त्याआधीच भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जळगाव दौऱ्यावर येणार आहे.

गृहमंत्री अमित शाह येत्या गुरुवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जळगावात त्यांच्या उपस्थितीत युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी आज रविवारी जामनेरात बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

असे आहेत दौऱ्याचे नियोजन
१५ फेब्रुवारी रोजी अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून, जळगावसह अकोला व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार
असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. अमित शाह यांच्या उपस्थितीत जळगावात मोठे युवा संमेलन घेण्यात येणार आहे. या संमेलनातून ते जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधणार आहेत. अमित शाह यांचा दौरा, तसेच संमेलनाच्या नियोजनासाठी रविवारी जामनेरात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे