जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२४ । येत्या दोन तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार असून याच पार्श्वभूमीवर राज्यातील मित्र पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) असलेल्या घटक पक्ष महाविकास आघाडीने काही ठिकाणच्या जागांसाठी उमेदवारांची चाचपणी देखील सुरु केली आहे. अशातच महाविकास आघाडीच्या जळगाव जिल्ह्यातील अकरा जागांचे वाटप जवळपास निश्चित झाले आहे
त्यात शरद पवार गट सहा, काँग्रेस तीन तर शिवसेना (ठाकरे गट) दोन जागा लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पारोळा येथे झालेल्या आढावा बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक जळगाव शहराची जागा राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे जळगाव दौऱ्यावर येणार असून यादरम्यान सहा मतदारसंघांबाबत चर्चा होणार असल्याचंही समजत आहे. पाच वर्षांपासून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केलेल्या इच्छुकांकडून जागा वाटपात आपल्या पक्षाला जागा कशी सुटेल यासाठी नेत्यांकडे मनधरणी करणे आणि विजयाचे आराखडे मांडणे सुरू आहे.
असे संभाव्य जागा वाटप
राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जळगाव ग्रामीण, एरंडोल-पारोळा, मुक्ताईनगर, जामनेर, चोपडा, जळगाव शहर या जागा लढवल्या जातील. काँग्रेस पक्षाने केवळ रावेर, भुसावळ आणि अमळनेर याच मतदारसंघांत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे; तर शिवसेना ठाकरे गट पाचोरा व चाळीसगावात आपली ताकद लावणार आहे. ज्या पक्षाला ज्या मतदारसंघात विजयाची खात्री वाटते आहे त्यानुसारच जागा वाटपावर शिक्कामोर्तब होऊ शकते.