1 एप्रिलपासून जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांची वेळ बदलणार ; नवीन वेळ घ्या जाणून
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२३ । ‘अल निनो’बरोबरच यंदा भारतात पुढील दोन महिने नेहमीपेक्षा कडक उन्हाळा असेल, असे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी शाळांची वेळ बदलली जात आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी (प्राथमिक व माध्यमिक) शाळांची वेळ १ एप्रिलपासून सकाळी 7 ते दुपारी 1 अशी राहणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी जारी केले.
उष्माघात उपाययोजनांतर्गत शाळांच्या वेळेत हा बदल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी उष्माघात उपाययोजनासाठी स्थानिक स्तरावर करावयाच्या नियोजनाविषयी सूचना दिलेल्या आहेत.
त्यात जळगाव जिल्हा उष्माघात प्रवण असल्याने व ही बाब आपत्ती या सदरात येत असल्याने या पूर्वीच विविध उपाययोजना सूचविण्यात आलेल्या आहेत. त्यात आता शाळांच्या वेळेतही बदल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी (प्राथमिक व माध्यमिक) शाळांच्या वेळेत १ एप्रिलपासून सकाळी ७ ते दुपारी १ असा बदल करण्यात आला आहे.
तसेच उष्माघाताची तीव्रता लक्षात घेवून संबंधितांनी तात्काळ कार्यवाही करावी, सदर आदेश सर्व शाळांना बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.