जळगाव लाईव्ह न्यूज । 7 जानेवारी 2024 । गेल्या काही दिवसापूर्वी ऐन थंडीत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान आले होते. या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोवर महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 9 जानेवारीपर्यंत राज्यातील काही ठिकाण पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यादरम्यान जळगाव जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आजही तुरळक पावसाची शक्यता असून 9 जानेवारी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.
नैऋत्य अरबी समुद्रावरील सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तर कोकणातून उत्तरेकडे पसरलेल्या बाष्पाचे ढग तयार झाल्यामुळे हवामानावर परिणाम दिसून येत आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज 7 जानेवारीला राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर 8 जानेवारीला धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून पावसाची येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्या राज्यात दिवसभर ढगाळ वातावरण आहे. मात्र हवा असल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. गेल्या दोन तीन दिवसात राज्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दरम्यान, हिवाळ्याच्या दिवसांत कुडकुडणाऱ्या थंडी ऐवजी पावसाच्या इशाऱ्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. पावसाचा अंदाज असल्याने कापणी केलेले धान तूर तसेच कापूस सुरक्षित ठिकाणी साठवण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.