जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात झालेल्या माजी सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याकांडाने राजकीय वर्तुळात खळबळ मचली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य करत भूमिका मांडली.त्यांनी स्पष्ट केले की या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल.
“बीडमधील सरपंच हत्याकांडाची चौकशी एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन यंत्रणांद्वारे चालू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे,” असे अजित पवार म्हणाले. “कोणत्याही चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास, त्या व्यक्तीवर कुणाचीही गय न करता कडक कारवाई केली जाईल. या प्रकरणात पक्षाचा विचार न करता न्याय दिला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना रोखठोक उत्तर दिले. “बीड प्रकरणातील चौकशी पूर्णपणे निष्पक्ष असेल. प्रत्येकाची चौकशी करून किती फोन झाले, कुणाचे किती फोन कुणाला झाले, याचा बारकाईने अभ्यास केला जाईल. सरकारने या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे आणि कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल,” असे त्यांनी नमूद केले.