⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | बातम्या | ना.अजित पवारांनी मलीक कुटुंबावर सोपवली मोठी जबाबदारी

ना.अजित पवारांनी मलीक कुटुंबावर सोपवली मोठी जबाबदारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते स्व.गफ्फार मलीक यांच्या निधनानंतर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी मलीक परिवाराची भेट घेतली. मुस्लीम समाजात कोविड लसीकरणाची असलेली स्थिती लक्षात घेता लसीकरण अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी ना.पवार यांनी मलीक कुटुंबियांवर सोपवली आहे.

जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री ना.अजीत पवार यांनी स्व.गफ्फार मलीक यांच्या काट्याफैल शनिपेठ येथील निवासस्थानी भेट दिली. मलिक कुटुंबातील सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस एजाज अब्दुल गफ्फार मलीक, वहाब मलीक, नदीम मलीक, फैजल मलीक, मझहर पठाण, डॉ.अशोक पाटील आदींसह इतर पदाधिकारी व नातेवाईक उपस्थित होते. ना.अजित पवार यांनी कुटुंबियांची विचारपूस केल्यावर सर्वांची ओळख करून घेतली.

जळगाव जिल्ह्यात लसीकरणाची स्थिती बैठकीत जाणून घेतली असता कमी असून मुस्लीम समाजात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याबाबत उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी एजाज मलिक यांना विचारणा केली. समाजात अद्याप भीतीचे प्रमाण असून बरेच गैरसमज देखील आहेत. हळूहळू लसीकरण वाढविले जात असून जनजागृती केली जात आहे. आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले असून नुकतेच एका दवाखान्यात लसीकरण शिबीर देखील घेण्यात आले होते अशी माहिती एजाज मलिक यांनी दिली. जिल्ह्यात लसीकरणाचे आणि विशेषतः मुस्लिम समाजात लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी जबाबदारी ना.पवार यांनी मलिक कुटुंबावर सोपवली आहे.

स्व.गफ्फार मलिक यांचे कार्य फार मोठे होते. पक्षाच्या बांधणीत त्यांचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्य करण्यासाठी पुढाकार घ्या. काहीही अडचण आली तर सांगा मी कायम तुमच्यासोबत आहे, असा विश्वास देऊन ना.अजित पवार पुढील कार्यक्रमासाठी निघाले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा संपर्क प्रमुख श्री.आदिक, जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पाटील आदी उपस्थित होते. ना.पवार यांना पाहण्यासाठी परिसरात आणि घराबाहेर मोठा जमाव जमलेला होता. आपल्या वाहनात बसण्यापूर्वी ना.पवार यांनी सर्वांना हात देत त्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या.

पहा भेटीचा आणि चर्चेचा संपूर्ण व्हिडीओ :
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/486498036126375

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.