⁠ 
बुधवार, मे 1, 2024

जळगावहुन आता पुण्यासाठी सुरु होणार विमानसेवा ; किती असेल तिकीट दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२४ । जळगावकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जळगाव विमानतळावरून ‘फ्लाय ९१’ विमान कंपनीकडून गोवा, हैदराबाद ही विमान सेवा १८ एप्रिलपासून सुरु होणार आहे. तर पुणे येथील विमान सेवा २५ मेपासून सुरू होणार आहे. दरम्यान, पुण्यातील सेवा ही आठवडाभर देण्याचा प्रयत्न राहणार आहे. मात्र गोवा, हैदराबाद येथील विमान तिकीट दराच्या तुलनेत पुण्यासाठीचे तिकीट दर ५०० रुपयांनी अधिक राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती विमान कंपनीचे व्यवसाय प्रतिनिधी नैमीश जोशी यांनी जळगाव येथे व्यापारी असोसिएशनसोबत झालेल्या बैठकीत चर्चेदरम्यान दिली.

विमान कंपनीचे अधिकारी तसेच कॅट संघटनेचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांसोबत दि. ९ रोजी बैठक झाली. कॅटचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, राज्य उपाध्यक्ष दिलीप गांधी, संजय शहा, देवेश कोठारी, पाचोरा व्यापारी असोसिएशनचे ललित पखारी आदी व्यापारी उपस्थित होते.

१८ एप्रिलपासून सुरू होणारी गोवा व हैदराबादची विमानसेवा दुपारूनच असणार आहे. मेच्या तिसऱ्या आठवड्यात २५ तारखेपर्यंत पुण्याची विमानसेवा आठवड्यातील सहाही दिवस सुरू करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. हे विमानतळ सैन्य दलाच्या ताब्यात असून ते सकाळी १० ते १२ या वेळेत सरावासाठी राखीव असल्याने ही वेळ वगळता नंतरच्या वेळेत जळगाव-पुणे विमान सुविधा दिली जाईल. दरम्यान, जळगावहुन हैदराबाद व गोव्याचे तिकीट १,९०० रुपये आहे. परंतु, पुणे सेवेत तांत्रिक कारणामुळे तिकीट दर ५०० रुपयांनी अधिक राहण्याची शक्यता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली.

हैद्राबाद, गोव्यासाठी असे आहेत विमानसेवेचे वेळापत्रक
१८ एप्रिल ते २६ ऑक्टोबर दरम्यान गोव्यावरून दुपारी २:२५ वाजता निघेल. दुपारी ४:१५ वाजता जळगाव विमानतळावर विमानाचे आगमन होईल, तसेच हैदराबादला सायंकाळी ४:३५ वाजता रवाना होईल. हैदराबादला ६:३० वाजता विमानतळावर आगमन होईल. हैदराबाद वरून संध्याकाळी ७ वाजता जळगावकडे उडाण करेल, तर रात्री ८:३५ वाजता जळगावला पोहोचेल. तर रात्री ८:५५ वाजता जळगाव वरून गोव्याला विमान निघेल, तर रात्री १०:०५ मिनिटाला गोव्याला विमान पोहोचेल. विमानसेवा सोमवार, गुरुवार, शनिवार असेल

अहमदाबाद सेवा पुढील वर्षी
जळगाव विमानतळावरून गोवा, हैदराबाद तसेच पुणे विमान सेवेनंतर अहमदाबाद विमान सेवा सुरु केली जाणार आहे. मात्र, ही सेवा पुढील वर्षी सुरु केली जाणार आहे. तसेच यावेळी व्यापाऱ्यांनी तिरुपती सेवेबाबत विचारणा केली. कंपनी हैदराबाद विमान सेवा ही भाविकांच्या सुविधेसाठी तिरुपतीला जाणाऱ्या विमानाच्या वेळेशी मॅच केली जाईल