जळगाव शहर

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन; शेतकऱ्यांसाठी पर्वणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर (जी. एस. ग्राऊंड) अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे आयोजीत चार दिवसीय कृषी प्रदर्शनाला आजपासून (11 मार्च) सुरवात होत आहे. हे कृषी प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून शेतकर्‍यांसाठी पर्वणी ठरणार आहे. पहिल्याच दिवशी प्रदर्शनास भेट देणाऱ्या शेतकर्‍यांना निर्मल सीड्सतर्फे भाजीपाल्याच्या दहा ग्रॅम बियाणाचे पाकीट मोफत दिले जाणार आहे. या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्डचे 11 ते 14 मार्च या चार दिवसांच्या कालावधीत होणार्‍या या कृषी प्रदर्शनात तब्बल चार एकरवर 220 पेक्षा अधिक स्टॉल्स आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक नामवंत कंपनींचे स्टॉल्स प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.

गरजेनुसार केला बदल
मजूर टंचाई व बदलते हवामान, ही शेतीतील प्रमुख समस्या बनली आहे. या प्रदर्शनात मजूर टंचाईवर पर्याय ठरेल अशी पिके तसेच कमी श्रमात, कमी पाण्यात, शाश्वत उत्पादन देणार्‍या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स असणार आहेत. याशिवाय प्रत्यक्षात पिकांवर ड्रोनद्वारे कशी फवारणी करता येते, हे शेतकर्‍यांना पाहता येणार आहे. हा खान्देशातील पहिलाच प्रयोग आहे. सोबतच दूध काढणी यंत्र, विविध आकारातील शेततळ्यांची माहिती तसेच त्रिस्तरीय मत्स्यपालन तसेच मोबाईलद्वारे शेतातील वीज पंप सुरु व बंद करण्याचे उपकरणही शेतकर्‍यांना पाहता येईल. प्रदर्शनस्थळी शेतीविषयक विविध पुस्तके देखील विक्रीसाठी उपलब्ध राहतील.

यंत्र व अवजारांचे स्वतंत्र दालन, सर्व शासकीय विभाग, बँक, प्रोजेक्ट रिपोर्टसह अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती मिळेल. याशिवाय नामवंत ठिबक कंपनींसह बियाणे, खते, किटकनाशके तसेच निविष्ठा उत्पादकांचे स्टॉल्सही राहणार आहे. प्रदर्शनस्थळी भेट देणार्‍या शेतकर्‍यांची गोदावरी फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी केली जाईल.

जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, र्‍हायनोमॅट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, ग्रीन ड्रॉप, सिका ई- मोटर्स प्रायव्हेट लिमीटेड व गोदावरी फाऊंडेशनचे हृदयालय हे सहप्रायोजक आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button