जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । जिल्ह्यातील विविध परिसरात खरीप हंगामाची लगबग सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह ग्रामीण भागातील खत विक्रेत्यांकडे नामांकित कंपन्यांचे रासायनिक तसेच सेंद्रिय खत उपलब्ध होत असून रासायनिक खतांच्या वाढत्या किमती पाहता शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करताना दिसत आहे. काही ठिकाणी महाराष्ट्रात परवानगी नसलेली सेंद्रिय खते विक्री होत असल्याने काही शेतकरी संभ्रमात आहेत. हा प्रकार कृषी पथकांना लक्षात येताच त्यांनी लागलीच खत विक्रेत्यांकडे भेट देत पाहणी करायला सुरवात केली आहे. मात्र, यामुळे काही खत विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
तालुक्यातील फुपनी, किनोदसह परिसरात केळी आणि कापूस पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड असून रासायनिक खतांच्या वाढत्या किमती पाहता शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करतांना दिसत आहे. परिसरातील खत विक्रेत्यांकडे नामांकित कंपन्यांचे रासायनिक तसेच सेंद्रिय खत उपलब्ध आहे. मागील एक महिन्यापासून काही ठिकाणी कंपनी ते शेतकरी परस्पर सेंद्रिय खत विक्री होत असून या खतांच्या गुणवत्तेबाबत अनेक शेतकरी संभ्रमात आहेत.
जि.प.कृषी अधिकारी विजय पवार आणि पं. समिती कृषी अधिकारी धीरज बढे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तालुक्यातील फुपनी येथे कंपनीचा माल खाली होत असतांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. संबंधित जागा मालक संजय दिनकर पाटील यांच्या गोडावूनमध्ये माल खाली होत होता. पथकाने जागा मालक आणि ट्रक चालकाकडे खतांचा महाराष्ट्र विक्री परवाना, चलन मागितले असता त्यांनी ते सादर केले नाही. पथकाने माल सील करायला सुरुवात केली असता संबंधितांनी इंडो गुजरात फर्टिलायझर कंपनीचे ग्रुप लीडर रामजश रामकेश यादव वय-२३ यांच्याशी संपर्क करीत त्यांना बोलावून घेतले.
पथकाने विचारणा केल्यावर यादव यांनी खतांच्या महाराष्ट्र राज्यातील विक्री परवाना आणि डिलिव्हरी चलन सादर केले. दरम्यान, माल ठेवण्यात आलेले गोडावून कंपनीच्या विक्री परवान्यात आणि जिल्हा विक्री घाऊक परवान्यात समाविष्ट नसल्याने तो माल खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार विक्रीस बंद करण्याचे आदेश पथकाने दिले. तसेच खतांच्या गुणवत्तेबाबत खात्री करायची असल्याने पथकाने खतांचा नमुना पुढील तपासाकामी नाशिक येथे पाठवला आहे.
पथकाने कठोर भूमिका घेत पुढील आदेश होईपर्यंत खतांची विक्री आणि इतर ठिकाणी काही हालचाली करणेबाबत सक्त सूचना केल्या आहेत. पथकाने टाकलेल्या या छाप्यामुळे अनेक विक्रेत्यांचे आणि कंपनीचे धाबे दणाणले आहे. जळगावात कुठेही असा संशयास्पदरित्या विना परवानगी तसेच महाराष्ट्र राज्यात बंदी घातलेला खतांचा माल विक्री केला जात असेल तर जळगाव लाईव्ह न्यूज 9823333119 किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.