⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

Maharashtra Shivsena : शिवसेनेच्या उभारीसाठी आदित्य ठाकरे मैदानात, उद्यापासून राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’!

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । राज्यातील ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार जाऊन एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांच्या गटात सामील होणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. शिवसेनेला लागलेली गळती रोखण्यासाठी आता आदित्य ठाकरे मैदानात उतरणार आहेत. राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे. उद्यापासून राज्यभरात यात्रा सुरु होणार असून सुरुवातील मुंबईतील प्रत्येक परिसर पिंजून काढला जाणार आहे.

विधान परिषद निवडणूक आटोपल्यावर नॉट रिचेबल झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरुवातीला ११ आमदार होते मात्र नंतर हा आकडा एक एक करून वाढत ५० वरती जाऊन (Shivsena MLA) पोहोचला. सुरत, अहमदाबाद, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करून आमदार मुंबईत परतले. विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करीत नवीन सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तरी शिवसेनेतील गळती कमी न होता आणखी वाढली आहे. ठाण्यातील ६६ तर जळगाव मनपातील ९ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेक नेते, स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते देखील शिंदे गटाकडे वळू लागले आहेत. राज्यात शिवसेनेला लागली गळती थांबवण्यासाठी आता आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे.

शिवसेनेतली पडझड रोखण्यासाठी आदित्य ठाकरे हे उद्यापासूनच निष्ठा यात्रेवर निघत आहे. आदित्य ठाकरे हे मुंबईतला प्रत्येक मतदार संघ प्रत्येक शाखा पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या यात्रेची सुरुवात ही बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातून म्हणजेच मुंबईतील भायखळ्यातून होत आहे. आदित्य ठाकरे मुंबईतील ठाकरे गटाकडे उरलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आदित्य ठाकरे यांचीही निष्ठा यात्रा फक्त मुंबई पुरती थांबणार नाही, तर आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचाही प्लॅन आखला आहे. मुंबईनंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघाकडे आपले लक्ष वेधणार आहेत.

आदित्य ठाकरेंची ही निष्ठा यात्रा महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात निघणार आहे. बंडखोर आमदारांच्या मतदार संघात तर आदित्य ठाकरे जास्त ताकद लावून ही निष्ठा यात्रा काढणार आहेत. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. संघटन बांधून ठेवण्याचं काम करणार आहेत. मात्र आता आदित्य ठाकरे यांना शिवसेनेची गळती रोखण्यात किती यश येईल याबाबत ही शंका आहे. आदित्य ठाकरे यांच्या यात्रेनंतर शिवसेनेत किती आणि एकनाथ शिंदे गटात किती हे स्पष्ट होणार आहे.