जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोऱ्यातील महिलेच्या बँक खात्यातून ३ लाख १९ हजार ५१६ रुपयाची रक्कम अवैधरीत्या काढून घेतल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीच्या तब्बल दोन वर्षानंतर पाचोरा पोलिसांनी नागपूर येथून मुसक्या आवळल्या आहे. विशाल दीपक गायकवाड असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबात असे की, पाचोरा येथील स्विटी योगेश संघवी (वय ३८) रा. संघवी कॉलनी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिस हवालदार शरद पाटील यांनी आपले कौशल्य वापरले. तांत्रिक बाबींचा आधार घेत आरोपीचा शोध घेण्यात आला. पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांच्या मदतीने आरोपी विशाल दीपक गायकवाड यास नागपूर येथून अटक करण्यात आली.

फिर्यादी स्विटी संघवी यांच्या बँक खात्याला त्यांचा मोबाईल नंबर लिंक होता. मात्र स्विटी संघवी यांनी सदरचा मोबाईल क्रमांक बंद केला. तोच मोबाईल नंबर नंतर मोबाईल कंपनीने संशयित आरोपी विशाल दीपक गायकवाड रा. धंतोली, नागपूर याला दिला होता. फिर्यादीचे बँकेचे चेक बुक व एटीएम कार्ड कुरिअर कंपनीकडून डिलिव्हरीसाठी आले असताना कुरिअर कंपनीने या नंबरवर फोन केला. आरोपी विशाल गायकवाड याने खोटे बोलून हे पार्सल नागपूर येथील त्याच्या घराच्या पत्त्यावर मागवले. पार्सल स्वीकारल्यानंतर आरोपीने त्यातील एटीएम कार्डचा पिन सेट केला. त्यानंतर २१ ते २४ मार्च २०२३ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणाहून फिर्यादीच्या बँक खात्यातून अवैधरित्या एकूण ३ लाख १९ हजार ५१६ रुपये काढून फसवणूक केली आहे. विशाल गायकवाड याला न्यायालयीन कोठडी सुनावली.









