जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२५ । अयोध्याहून परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांवर काळाने घाला घातला. धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ गावातील भाविकांच्या बसला उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील अयोध्या-प्रयागराज महामार्गावर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती असून १५ ते २० जण जखमी झाल्याची झाले. आज शनिवारी पहाटे ४ वाजता हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ येथील भाविक अयोध्यातील भगवान राम लल्लाचे दर्शन घेतल्यानंतर बसने प्रयागराजला जात होते. बसमध्ये अंदाजे ४० भाविक होते. सुलतानपूर येथील कुरेभर चौकात पोहोचताच, समोरून एका अनियंत्रित ट्रेलरने बसला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बस आणि ट्रेलर दोन्ही उलटले.

उलटलेल्या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक आणि रस्त्यावरून जाणारे लोक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सुमारे १५ ते २० भाविकांना दुखापत झाली. तर एका महिला भाविकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेद्वारे कुरेभर सामुदायिक आरोग्य केंद्रात तातडीने नेण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच जळगाव आणि धरणगाव प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. फिरायला गेलेल्या सर्व नागरिकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात स्थानिक प्रशासनासोबत संवाद सुरू आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.










