जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यासह जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच भुसावळामधील एका शाळेत शिक्षण घेणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या शाळेतून मुख्याध्यापकांना खोटे सांगून घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तौसीफ जहाबाद तडवी (रा. पाल, ता. रावेर) याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेली ही १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी भुसावळ येथील शाळेत शिकत होती. ७ ऑगस्ट रोजी संशयित आरोपी तौसीफ जहाबाद तडवी हा भुसावळ येथील शाळेत आला. त्याने मुख्याध्यापकांना एक लेखी अर्ज देऊन आपण मुलीचा भाऊ असल्याचे खोटे सांगितले. मुख्याध्यापकांना फसवून त्याने मुलीला आपल्यासोबत घेतले आणि मुंबई, चोपडा आणि जळगाव या ठिकाणी तिला घेऊन गेला. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये त्याने तिच्यावर अत्याचार केला.

हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तात्काळ भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी तौसीफ जहाबाद तडवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख करत आहेत.






