डेंग्यूने घेतला शिरसोलीच्या युवकाचा बळी
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२३ । जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथील तरुणाचा डेंग्यूमुळे बळी गेला. उपचार घेत असताना खाजगी रुग्णालयात आज गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. देवेंद्र विकास बारी (वय १९, रा. पाण्याच्या टाकीजवळ, बारी नगर शिरसोली प्र.बो. ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून यामुळे शिरसोलीत आरोग्य यंत्रणेविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
शिरसोली मध्ये राहणार देवेंद्र विकास बारी हा गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती त्याला डेंग्यू आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्याला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे देवेंद्र बारी याच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला.
दरम्यान, याबाबत गावात माहिती कळताच गावकऱ्यांनी आरोग्य यंत्रणेविरुद्ध संताप व्यक्त केला. ग्रामपंचायतकडून गावात फवारणी आणि साफसफाई सुरू असल्याची माहिती सरपंचांनी दिली. मात्र ज्या ठिकाणी तरुण राहतो तिथे पाण्याच्या टाकीखाली आजूबाजूच्या घराचे सांडपाणी साचते. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरला आहे. डेंग्यू विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. दरम्यान शिरसोली गावामध्ये दोन आरोग्य उपकेंद्र आहे. तसेच फिरता आयुर्वेदिक दवाखाना देखील आहे.