जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२५ । पोळ्याच्या पार्श्वभूमीवर बैलांना नदीवर अंघोळीसाठी घेऊन गेलेल्या देवळसगाव (ता.जामनेर) येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुशील सुनील इंगळे (वय २२) असे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव असून ऐन पोळ्याच्या दिवशीच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आज पोळा सण असल्याने सुशील आपल्या बैलांना आंघोळ घालण्यासाठी सूर नदीकाठी गेला होता. दरम्यान पाऊस झाल्याने नदीला मोठा पूर आला होता. सुशील बैलांना घेऊन नदी काठी गेला असताना बैलांना अंघोळ घालत होता. यावेळी नदीचा प्रवाह आणि पाणी जास्त असल्याने तो खोल पाण्यात ओढला गेला. काही कळायच्या आतच पाण्याच्या लाटांमध्ये तो बुडाला.

सदरची घटना आजूबाजूला असलेल्या लोकांना समजताच त्यांनी सुशीलला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पाण्याच्या प्रवाहापुढे ग्रामस्थांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही. काही क्षणातच नदीपात्रात बुडालेला सुशील दिसेनासा झाला. या घटनेमुळे इंगळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बैलपोळा सणाच्या उत्साहावर पाणी फिरविणाऱ्या या घटनेने संपूर्ण गाव शोकमग्न झाले होते.










