जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२३ । गावठी कट्टा घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित तरूणाच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, चार जीवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे. किरण दिलीप सपकाळे (३४, रा. गेंदालाल मिल) असं संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, जळगाव शहरातील गेंदलाल मिल परिसरात राहणारा संशयित आरोपी किरण दिलीप सपकाळे हा शहरातील शास्त्री टॉवर चौकातील नवजीवन कलेक्शन दुकानासमोर हातात गावठी पिस्तूल आणि ४ जीवंत काडतूस घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस नाईक किशोर निकुंभ आणि पो.कॉ. तेजस मराठे यांना मिळाली.
त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सापळा रचून उड्डाणपुलाजवळून किरण सपकाळे याला ताब्यात घेतलं घेतलं. त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल आणि ४ हजार रुपये किमतीचे चार जिवंत काडतूस असा एकूण १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी पोकॉ तेजस मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण सपकाळे याच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रफुल्ल धांडे करीत आहेत.