Jalgaon : हातचलाखीने महिलेनं तीन नामांकित ज्वेलर्स दुकानांतून लाखोंचा ऐवज लांबविला

नोव्हेंबर 6, 2025 1:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२५ । एकीकडे जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून अशातच एका महिलेने हातचलाखीने शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानांतून लाखो रुपयाचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, सीसीटीव्हीच्या चित्रणात कैद झालेल्या अज्ञात महिलेचा शोध घेतला जात आहे.

jlchor

सर्वात आधी या महिलेने २७ ऑक्टोबरला शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्समध्ये चोरीचा यशस्वी प्रयत्न केला होता. या महिलेने सेल्समन गिरीश जैन यांच्याकडे १० ते १२ ग्रॅम वजनाच्या अंगठ्या मागितल्या. सेल्समनने अंगठ्यांचे दोन ट्रे दाखवले. तेव्हा महिला ही अंगठ्या बोटात घालून बघत होती. सेल्समन इतर डिझाइनचे ट्रे काढण्यासाठी खाली वाकल्यानंतर तिने आपल्या हातातील बनावट अंगठी ट्रेमध्ये ठेवली आणि त्या बदल्यात दोन सोन्याच्या (१०.२०० ग्रॅम आणि ८.१८० ग्रॅम) अंगठ्या घेऊन पळ काढला. नंतर दोन नकली अंगठी ठेवल्याचे सेल्समन गिरीष जैन यांच्या लक्षात आल्यानंतर सीसीटीव्हीचे चित्रण तपासले. त्यात हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेली, रंगाने गोरी आणि अंदाजे ५ फूट ६ इंच उंचीच्या महिलेनं दोन अंगठ्या लंपास केल्याचं दिसून आलं. त्यानंतर रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे व्यवस्थापक संतोष काळे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Advertisements

दरम्यान, बाफना ज्वेलर्सचे व्यवस्थापक संतोष काळे हे सोन्याच्या अंगठ्या चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता, त्याठिकाणी जळगावमधील भंगाळे ज्वेलर्सचे व्यवस्थापक संतोष चव्हाण हे देखील सोने चोरीची तक्रार करण्यासाठी आले होते. भंगाळे ज्वेलर्समधुनही २७ तारखेला एका महिलेने दुपारी साडेपाचच्या सुमारास हातचलाखी करून सुमारे १३ ग्रॅम वजनाची आणि सुमारे एक लाख ४५ हजार रूपये किमतीची सोन्याची अंगठी चोरून नेली होती. अर्ध्या तासाच्या अंतराने दोन्ही दुकानांमधून जवळपास ३० ते ३५ ग्रॅम वजनाच्या अंगठ्या महिलेने लंपास केल्याचे निदर्शनास आल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्यात महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

Advertisements

दरम्यान, शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एक नोव्हेंबरला दाखल तक्रारीनुसार, जळगावमधील पु. ना. गाडगीळ सुवर्ण पेढीतुनही एका महिलेने २७ तारखेला सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास १० ग्रॅम वजनाची एक लाख ४० हजार किमतीची सोन्याची अंगठी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. तिन्ही सुवर्ण पेढ्यांमधील चोरीच्या घटनांचे साम्य लक्षात घेता एकाच महिलेचा त्यात हात असल्याचा संशय बळावला आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे त्या महिलेचा शोध सुरू केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now