माध्यमिक शिक्षक संघाचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आमदार किशोर दराडे व शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेकवेळा शिक्षणाधिकारी कामे मार्गी लावण्याबाबत विनंती करण्यात आली. मात्र, त्यानंतरही प्रलंबित कामे मार्गी न लागल्याने महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघातर्फे मंगळवार दि.३० रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
प्रलंबित असलेल्या नियमित वेतन श्रेणीला मान्यता देणे, नियमित वेतन श्रेणीला सुधारित मान्यता देणे, शालार्थ मान्यता प्रस्ताव, अप्रशिक्षित पदवीधर वेतन श्रेणीतून पदवीधर वेतन श्रेणी मान्यतांची मागणी यासह जळगाव, भुसावळ, रावेर, चोपडा येथील शाळेतील शिक्षकांचे प्रलंबित कामे मार्गी लावण्यात यावे, यासाठी दि.१५ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात संघटनेच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर दि.१६ नोव्हेंबर रोजी आमदार किशोर दराडे व शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या उपस्थितील शिक्षण दरबार कार्यक्रमात मान्यता देवून कार्यवाहीच्या सुचना करण्यात आल्या होत्या.
सूचनेनंतरही कार्यवाही न झाल्याने दि.१८, २५ व २६ नोव्हेंबर रोजी शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रलंबित कामे मार्गी लावण्याची विनंती संघटनेकडून करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही या प्रकरणांकडे दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने मंगळवार दि.३० रोजी जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.