जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा येथील रेल्वे स्थानकानजीक रेल्वे उड्डाणपुलाखाली रेल्वे लाईन ओलांडताना एका ४५ वर्षीय इसमाचा धावत्या रेल्वेखाली सापडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किशोर पाटील असं मयताचे नाव असून या घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दूर क्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाचोरा शहरातील गुरुदत्त नगर, कृष्णापुरी येथील रहिवासी किशोर पाटील हे बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे लाईन ओलांडत असतांनाच भुसावळकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या (अप रेल्वे क्रं. २६१०२) या भरधाव रेल्वेखाली सापडून पाटील यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती वंदेभारत एक्प्रेसचे लोकोपायलट आर. भावसार यांनी पाचोरा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक यांना वॉकी टॉकी द्वारे दिली.

या घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलिस दूर क्षेत्राचे पोलिस हवालदार लक्ष्मण पवार हे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. मयत किशोर पाटील यांच्या पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पो. उ. नि. प्रविण निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार लक्ष्मण पवार हे करत आहेत.









