जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२५ । सध्या उन्हाचा भडका उडाला असून यातच वाहनांना आग लागत असल्याच्या घटना समोर येत आहे. अशीच एक घटना अमळनेर तालुक्यातून समोर आलीय. ज्यात धावत्या मोटारसायकलने अचानक पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीत संपूर्ण वाहन जळून खाक झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

नेमकी घटना काय?
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप पाटील आपल्या बहिणीला घेऊन हळदीच्या कार्यक्रमासाठी जात होते. मात्र, प्रवासादरम्यान अचानक त्यांच्या दुचाकीमधून धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी त्वरित वाहन थांबवले आणि खाली उतरून सुरक्षित अंतरावर गेले. काही क्षणांतच दुचाकीने पेट घेतला आणि संपूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेदरम्यान संदीप पाटील आणि त्यांची बहीण सुखरूप राहिली, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले. ही घटना अचानक घडल्याने काही काळ परिसरात घबराट पसरली. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुचाकी पूर्णतः जळून नष्ट झाली.
या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. दुचाकीच्या इंधन गळतीमुळे किंवा इलेक्ट्रिकल फॉल्टमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अधिकृत तपासानंतरच यावर ठोस निष्कर्ष काढता येईल. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने वाहनधारकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः प्रवास करताना वाहनाच्या तांत्रिक स्थितीकडे लक्ष देण्याचे आणि कोणतेही संशयास्पद लक्षण दिसल्यास त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.