अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला असून, तथ्य व सत्य जनतेसमोर आणावे; आ. मंगेश चव्हाण
जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ नोव्हेंबर २०२१ । शहरातील अजिंठा विश्रामगृहात ८ रोजी सायंकाळी ४ वाजता एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला असून, त्यात जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी सहभागी असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्यक्ष भेटी, भ्रमणध्वनी या माध्यमातून माझ्यादेखील सदर घटनेची चर्चा कानावर आली. या अनुषंगाने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यातून तथ्य व सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
सविस्तर असे की, अजिंठा विश्रामगृहातील कथित अत्याचार प्रकरणाचा बोभाटा झाल्यानंतर आता प्रचंड घडामोडी घडत आहेत. यात कथित रित्या दोन लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याचा आरोप करण्यात येत आहेत. या संदर्भात कुणीही समोर काही स्पष्ट बोलत नसले तरी या चर्चांचा रोख हा भारतीय जनता पक्षाच्या दिशेने असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमिवर, भाजपच्या नेत्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले. त्या म्हटले आहे की, महोदय, उपरोक्त विषयान्वये सविनय विनंती करतो की, काल दि. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजेपासून जळगाव शहरात एका अल्पवयीन मुलीवर अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे लैंगिक अत्याचार झाला असून, त्यात जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी सहभागी असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्यक्ष भेटी, भ्रमणध्वनी या माध्यमातून माझ्यादेखील कानावर सदर घटनेची चर्चा आली.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेचे आधुनिक स्वरूप ऑनलाईन पोर्टल्स, सोशल मिडिया यावर देखील सदर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या. त्यात विशेषतः लोकप्रतिनिधी व आमदारांचा उल्लेख वारंवार येत असल्याने जनमानसात संशयाचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्रकारिता म्हणून त्यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर ऑनलाईन पोर्टल्स यांनी या बातम्या दिल्या असाव्यात ते त्यांचे कामच आहे. मात्र, अश्या घटनांमध्ये दखल घेण्याचा गुन्हा दाखल, व तपास करण्याचा अधिकार असणार्या पोलीस यंत्रणेकडून याबाबत अधिकृत कुठलीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
संबंधीत लैंगीक अत्याचाराची घटना त्यातल्या त्यात अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार ही समाजाला काळिमा फासणारी बाब आहे. ऑनलाईन पोर्टल्स, सोशल मिडियात आलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या बातमीची आपण गंभीरपणे दखल घ्यावी व सदर प्रकरणाची तत्काळ सखोल चौकशी करून तथ्य व सत्य जनतेसमोर आणावे, तसेच या बातम्यांच्या अनुषंगाने जाहीर खुलासा जिल्ह्याचे पोलीस
अधिक्षक या नात्याने आपण करावा ही नम्र विनंती असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी व पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार उपस्थित होते.