⁠ 

अखेर स्वप्न पूर्ण! तब्बल 32 वर्षांनंतर पायात चपला घातल्या, जळगावातील कारसेवकाची अनोखी कहाणी

जळगाव लाईव्ह न्यूज । 23 जानेवारी 2024 । शतकानुशतके वाट पाहिल्यानंतर रामलला त्यांच्या अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात वास्तव्यास गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत सोमवारी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सांगता झाली. यामुळे रामभक्तांची सुमारे ५०० वर्षांची प्रतीक्षा २२ जानेवारीला पूर्ण झाली. तर याच दरम्यान जळगावातील एका कार सेवकाची अनोखी कहानी समोर आली आहे.

राम मंदिराचं स्वप्न उराशी बाळगून या कारसेवकानं जोपर्यंत अयोध्येत राम मंदिर होणार नाही तोपर्यंत पायात चपला घालणार नाही अशी शपथ घेतली होती. अखेर 32 वर्षांनी 60 वर्षीय कारसेवक विलास भावसार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थित चपला घालण्यात आल्या.

जळगावमधील रथ चौकातील विलास अंबादास भावसार एक सामान्य कारसेवक आणि ते पानपट्टी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. मनात राम आणि अयोध्येत राम मंदिर व्हावे ही शपथ घेऊन जळगावातील कारसेवक 1992 मध्ये अयोध्येत गेले होते. अयोध्येत पोहोचल्यानंतर तेथे राम भक्ताची कारसेवकांच्या गर्दीत चप्पल तुटली. विलास भावसार यांनी जो पर्यंत राम मंदिर होत नाही तोपर्यंत पायात चपला घालणार नाही असा संकल्प केला होता.

विना चप्पल ते अयोध्येवरून घरी परतले. त्यांनतर ते ३२ वर्ष अनवाणी फिरत होते. भावसार यांच्या पत्नीने आपल्या मुला-मुलींच्या लग्नात त्यांना चपला घालण्याची विनवणी करण्यात आली होती. तरीही त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. अखेर २२ जानेवारी त्यांच्या मानतील इच्छा पूर्ण झाली.

पाचशे वर्षांचा वनवास सहन करीत रामलल्ला अखेर त्यांच्या मंदिरात विराजमान झाले आहेत. 32 वर्षांनी कारसेवकाचे राम मंदिर उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांना समाधान वाटत आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथे भावसार यांना सपत्नीक बोलावून त्यांचा सत्कार करीत त्यांना चपला घातल्या. तेव्हा भावसार यांनी गिरीश महाजन यांनी आंदोलनात खणखणीत आवाजात घोषणा देत आपले नेतृत्व केल्याची आठवण सांगितली.