जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२५ । १३ मे रोजी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल लागला आहे. या दहावी परीक्षेत चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर बेवारस आढळून आलेल्या एका मुलीने ८९ टक्के गुण मिळवून आपण अनाथ असूनही बाजीगर असल्याचे स्वतःला सिद्ध केले आहे. या मुलीला आपले आई-वडील देखील आठवत नाहीत. दहावीतील यशानंतर तिने उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त केली आहे.

साधारणपणे दहा वर्षांपूर्वी चाळीसगाव रेल्वेस्थानकावर पूजा (नाव बदललेले) बेवारस स्थितीत मिळून आल्यानंतर तिला सामाजिक संस्थेच्या मदतीने बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आले. निरीक्षणगृहाच्या वतीने तिला शहरातील प्रतिभाताई माध्यमिक विद्यालयात प्रवेश देण्यात आला. पूजाने निरीक्षणगृहातील कर्मचारी आणि सोबत असलेल्या मुलींनाच आपले कुटुंब बनवून त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहणे सुरू केले.
पूजा अभ्यासात हुशार असल्यामुळे शाळेतदेखील तिची चुणूक दिसत होती. दहावीचा अभ्यास करण्यासाठी तिने स्वतः नियोजन केले. चांगला अभ्यास केला. अखेर या परीक्षेत शाळेतून पहिली येण्याचा मान मिळवला. ८९ टक्के मिळवून ती विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाली आहे. पुढे तिचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचा मानस आहे. यासाठी निरीक्षणगृहाच्या माध्यमातून पुण्याच्या क्षमता संस्थेशी संपर्क करण्यात आला आहे. या संस्थेच्या मदतीने पूजाचे पुढील उच्च शिक्षण पूर्ण केले जाणार आहे. या निकालाबद्दल पूजाने आनंद व्यक्त केला असून, तिने भविष्यात उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.