जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२३ । कोरोना महामारीतून जग सावरले असून अशातच मात्र गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये मायक्रोप्लाजमा न्यूमोनिया या बॅक्टेरिया या आजाराने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यामुळे जगाची पुन्हा चिंता वाढली असून चीनमधील या आजाराची भारतात एन्ट्री झाली आहे. दिल्लीत ७ रुग्ण आढळून आले आहेत. हे सातही रुग्ण दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासठी दाखल झाले होते असं स्पष्ट झालं आहे. एप्रिल ते सप्टेंबर या काळामध्ये असे ७ रुग्ण आढळल्याचं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
अचानक चीनमधील नव्या आजाराचे रुग्ण भारतात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. देशभरात आयजीएम एलिसा आजाराच्या चाचण्या वाढवण्यात याव्यात, अशी मागणी अनेकांकडून होत आहे. सध्या आरोग्य विभाग अशा संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
एम्स रुग्णालयाने पीसीआर आणि आयजीएम एलिसा या दोन चाचण्यांच्या माध्यमातून या ७ रुग्णांचा शोध लावला आहे. या रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ३ आणि १६ टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे. न्यूमोनियाच्या रुग्णांची चाचणी केल्यानंतर त्यांना चीनमधील विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
काय आहेत आजाराची लक्षणं?
चीनमधून प्रसार होत असलेल्या या आजाराची लक्षणे प्रामुख्याने सामान्य न्यूमोनियासारखीच दिसतात. या आजाराला ‘वॉकिंग न्यूमोनिया’ असंही नाव देण्यात आलं आहे. सुरुवातीला घसा खराब होणे, थकवा जाणवणे, ताप येणे, दीर्घकाळ खोकला राहणे आणि डोकेदुखी अशा लक्षणांचा यात समावेश आहे. हा आजार मुख्यत्वे लहान मुलांना टार्गेट करतो.