जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२३ । अलीकडे हनी ट्रॅपमध्ये अडकून फसवणूक करत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशीच एक घटना जळगावमधून समोर आलीय. जळगावच्या ५१ वर्षीय व्यावसायिकाला हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्याच्याकडून तब्बल ७ लाख ७७ हजार रुपये उकळल्याची घटना समोर आलीय. याबाबत व्यावसायिकाने सायबर पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दिली आहे.
नेमकी घटना काय?
शहरातील उच्चभ्रू वस्तीमधील ५१ वर्षीय व्यावसायिकाला १६ ते १९ जूनच्या दरम्यान त्यांच्या फेसबुक खात्यावर रिया अग्रवाल नामक खातेधारकाने फिर्यादी यांच्याशी मेसेंजर वर चॅटिंग व व्हिडिओ कॉल करून ओळख निर्माण केली. त्यानंतर फिर्यादीशी गोड बोलून त्याचा अश्लील व्हिडिओ तयार केला.
त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. संशयित आरोपीच्या बँक व मोबाईल मधील गुगल पे खात्यामध्ये फिर्यादी यांनी वेळोवेळी ७ लाख ७७ हजार ७४५ रुपये पाठविले. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी व्यवसायिकांनी सायबर पोलीस स्टेशनला धाव घेतली. त्या वरून अज्ञात रिया अग्रवाल नामक अकाउंट धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर करीत आहेत.