⁠ 

खुशखबर! घर बांधणे झाले आणखी स्वस्त, स्टीलच्या किमतीत मोठी घसरण

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२३ । घराचे बांधकाम असो वा इतर कोणतेही बांधकाम, लोखंडी रॉड ही ताकदीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. घर बांधताना सध्या बाजार भावात बांधकाम वस्तूंची, साहित्यांची किंमत किती आहे. या वस्तूंच्या किंमतीच्या कमी झालेल्या दरांचा अंदाज घेऊन माणूस घर बांधायला सुरुवात करतो. अशात जर तुमचाही घर बांधण्याचा विचार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बांधकामासाठी लागलेल्या स्टीलच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

युक्रेन रशिया युद्धजन्य परिस्थिती गेल्या काही दिवसांपूर्वी बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणात महागले होते. बांधकाम स्टीलचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापाऱ्यांनी स्टॉक करणंही बंद केलं होतं. तर, या किमती कमी करण्याची मागणीही सरकारकडे केली होती. गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यात बांधकाम स्टील म्हणजे सळयांची किंमत जवळपास ७० हजार रुपये प्रति टन म्हणजे ७० रुपये किलो होती. मात्र, मे महिन्यात या किमतीत घट झाली असून एप्रिल महिन्यात ७० रुपये किलो असलेले स्टील मे महिन्यात ६१ हजार ५०० रुपये टनांवर पोहोचले होते.

म्हणजेच, बाजारात ६१ -६२ रुपये किलो दर होते. यंदा मात्र ५५ रुपयांवर स्टील आले आहे. त्यामुळे अनेकांना बांधकाम करण्यासाठी संधी चालून आली आहे. मात्र हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात स्टीलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण या दरम्यान, स्टीलला मागणी असते. त्यामुळे दरवाढीची शक्यता आहे. असं झाल्यास बांधकाम करणाऱ्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे.

सिमेंटमध्ये चढउतार
दुसरीकडे सध्या जळगावच्या बाजारात सिमेंटचे दर ३२० ते ३५० रुपये प्रति बॅग आहे. यापूर्वी ३१० ते ३३० रुपयापर्यंत दर होते. या दरात चढउतार दिसून येत आहे.