जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नसून याच दरम्यान, चाळीसगावमधून एक दुर्दैवी घटना समोर आलीय.
चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील तळेगाव गावाजवळ भरधाव कंटेनरने एका पाच वर्षाच्या चिमुकल्याला चिरडलं. या अपघातात पाच वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर गावातील संतप्त जमावाने कंटेनरची तोडफोड करत कंटेनर पेटवून दिला. तसेच संतप्त गावकऱ्यांनी चाळीसगाव-नांदगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.
विशेष म्हणजेच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या घटनेनंतर तणाव इतका वाढला की, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी तैनात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा दौरा सोडून तळेगावला जावं लागलं आहे.
संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गावातील परिस्थिती नियंत्रणात आणली. पण पाच वर्षीय चिमुकल्याचा या घटनेत मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. तर काही जण प्रचंड संतापले आहेत. तळेगावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे. रस्त्यावर गतिरोधक टाकून, अवजड वाहतूक गावातून बंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.