⁠ 
सोमवार, मे 27, 2024

दुचाकी अपघातात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू ; एरंडोल तालुक्यातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२४ । एरंडोलहुन जळगावी येण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीचा अपघात होऊन त्यात दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना घडली. ही घटना एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ घडली असून राज उर्फ राजेश विनोद बनसोडे (वय २२ वर्ष, रा. डॉ. आंबेडकर नगर, जुने जळगाव, हल्ली मु. एरंडोल) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

राज उर्फ राजेश विनोद बनसोडे हा आई व दोन बहिणींसह डॉ. आंबेडकर नगरात राहत होता. राजेश हा पूर्वी जिल्हा रुग्णालयामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला होता. आता सध्या तो एरंडोल शहरात मामाकडे राहत होता व बँड पथकात कामाला होता. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.

दरम्यान, रविवारी दि. १४ एप्रिल रोजी कार्यक्रमानिमित्त राजेश हा त्याच्या मित्रासोबत संध्याकाळी जळगाव शहरात जाण्यासाठी निघाला. पिंपळकोठा गावानजीक संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास समोरून अचानक ट्रक आल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. त्यात दुचाकी घसरून राजेश व त्याचा मित्र गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले असता तेथे राजेश बनसोडे याला वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासून मयत घोषित केले.

तर त्याच्या मित्रावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. जिल्हा रुग्णालयामध्ये मित्र व नातेवाईकांनी रात्री मोठी गर्दी केली होती. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. राजेश बनसोडे याच्या बहिणीचा २६ एप्रिल रोजी विवाह समारंभ आहे. मात्र आता राजेशच्या मृत्यूमुळे लग्न घरावर शोककळा पसरली आहे.