जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२४ । सध्या जळगाव जिल्ह्यात उन्हाची तिव्रता जास्त प्रमाणात असल्याने उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उष्माघातापासून वाचण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आलीय. जाणून घ्या काय आहेत.
उष्माघातापासून वाचण्यासाठी हे करा?
१) ते २ वर्षापर्यंतच्या स्तनपान करणाऱ्या बालकांना पुरेसे स्तनपान होऊन बालकांमध्ये जलशुष्कता होऊ नये या करिता सर्व आशास्वयंसेविका, आरोग्यसेविका व समुदाय आरोग्य अधिकारी यांनी बालकांची नियमित तपासणी करावी व योग्यत्या उपाययोजना कराव्यात.
२) सर्व समुदायआरोग्यअधिकारी व आरोग्यसेविका यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गरोदरमाता व स्तनदामाता यांना नियमित भेटी देऊन वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात यावी व त्यांना उपचाराची गरज असल्यास तातडीची संदर्भसेवा देण्यात यावी.
३) दहा वर्षाखालील सर्व बालकांना सकाळी १० ते सायं ६ यावेळेत उन्हात जावू देवू नये किंवा खेळू देवू नये असे सर्व पालकांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच त्यांना डोक्यावर टोपी किवा रुमाल, छत्री वापरण्यास सांगावी, भरपूर पाणी पाजवावे व सावलीत राहण्या बाबत आवाहन करावे.
४) सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि आपले दैनंदिन कामकाजाकरिता घराबाहेर जाणे गरजेचे असल्यास दुपारी १२ ते५ वाजेपर्यंत डोक्यावर टोपी किवा रुमाल, छत्रीचा वापर करावा, थोड्यावेळाने सावलीत थांबावे, त्याचप्रमाणे भरपूर पाणी प्यावे व अति शारीरिक कष्टाची कामे टाळावी.
५) गंभीर जलशुष्कता (उलटीवसंडास) डायरियाचे लक्षणे, स्नायूंना गोळे, थकवा, अचानक तीव्र घाम सुटणे, तीव्र डोकेदुखी होणे, अस्वस्थ वाटणे, गुंगी येणे, चक्कर येणे अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेत रुग्णांनी वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावे तसेच तातडीची सेवा उपलब्ध होण्यासाठी शासनाचा टोलफ्री क्रमांक १०७७/१०८ ला संम्पर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
६) उष्माघाताचा त्रास उद्भवल्यास खालीलप्रमाणे प्रथमोपचार करण्यात यावेत.
उष्माघाताचा त्रास होत असल्यास लगेच सावलीमध्ये आणावे
उष्माघाताचा त्रास होत असल्यास पायाखाली उशी ठेवून आडवे झोपण्यास सांगावे.
उष्माघात झालेल्या लहान बालकास तो जागी असल्यास वारंवार थंड पाण्याचे घोट पाजवावे.
उष्माघाताचा त्रास होत असलेल्या बालकांच्या कपाळावर व अंगावर पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात.
उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे जेणेकरून ते गुदमरून जाणार नाही.
बालक बेशुद्ध असल्यास त्याला खाण्यास किंवा पिण्यास काहीही देवू नये.
७) उष्माघात टाळण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना व काळजी घेणे
तहान नसतांना सुद्धा वारंवार पुरेसे पाणी प्यावे.
सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरणे.
प्रवास करतांना सोबत पाणी घ्या.
आपले घर थंड ठेवावे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
ओ. आर. एस, लिंबूपाणी, ताक, लस्सी इ. घ्या.
पंख्याचा वापर करावा आणि थंड पाण्याने आंघोळ करावी.