जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२४ । राज्यातील काही भागात अद्यापही अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी तापमानाने उच्चांक गाठला आहे. जळगाव आणि धुळे मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. जळगावचे तापमान ४४ अंशावर गेल्याने अंगाची लाही-लाही करत भाजून काढणा-या उन्हामुळे जळगावकर चांगलेच हैराण झाले.
आता उकाडा कधी कमी होणार, याची जळगावकर वाट पाहत. मात्र आगामी आणखी काही दिवस उकाड्यापासून सुटका मिळण्याची शक्यता कमीच आहे. यातच दुसरीकडे हवामान खात्याने आज मंगळवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला असून यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, तर काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आजपासून पुढील ५ दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
या जिल्ह्यात पावसाचा इशारा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्हांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथे वादळी पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यात गारपीट होऊ शकते, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह, कोकणात आज उष्ण व दमट वातावरण असेल. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे.
जळगावात काय आहे अंदाज ?
जळगाव जिल्ह्यात चार दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली असून, अजून शनिवारपर्यंत ही लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा वाढला आहे. सोमवारी पारा ४३.९ अंशावर पोहोचला होता. दरम्यान, २३ मेपर्यंत पारा ४६ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. शनिवारपासून तापमानात काही प्रमाणात घट होऊ शकते. २७ मे नंतर मात्र जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनासोबतच तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज आहे.