जळगाव लाईव्ह न्यूज | 18 मे 2024 | सोने चांदी दरात चढउतार दिसून येत आहे. या आठवड्यात चांदी दराने विक्रमी पातळी गाठली आहे. जळगाव सुवर्णपेठेत चांदीच्या भावात शुक्रवारी एकाच दिवसात एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ती ८७ हजार ४०० रुपये प्रति किलो अशा विक्रमी दरावर पोहचली. चांदीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव ठरला आहे. सोन्याचे भाव ७३ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे.
एप्रिलमध्ये चांदीच्या भावात वाढ सुरू झाली. नंतर मात्र एप्रिलच्या अखेरीस भाव कमी झाले. पुन्हा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते वाढू लागले. त्यात १३ मेपासून तर सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये ८४ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १३ मे रोजी ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. दुसऱ्या दिवशी १४ रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८५ हजार रुपयांवर पोहचली.
१५ रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर १६ रोजी एक हजार रुपयांची वाढ झाली व चांदी ८६ हजार रुपये प्रति किलो अशा उच्चांकी भावावर पोहचली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात १७ मे रोजी हा उच्चांक मागे टाकत थेट एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन चांदी ८७ हजार ४०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.