जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२४ । सध्या जळगाव जिल्ह्यात तापमान वाढीने कहर केला असून जळगावकरांना मे हिटचा चांगलाच तडाखा बसत आहे. यातच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईला समोरे जावं लागत आहे. जामनेर तालुक्यातील बहुतांश गावांमधील पाणीटंचाईने डोके वर काढल्याचे भीषण चित्र समोर येऊ लागले आहे. विशेष राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचा हा तालुका आहे. सध्या तालुक्यातील तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पंचायत समितीकडे आणखी चार गावांनी टँकरची मागणी केली आहे.
रोटवद व मोरगाव येथे गेल्या महिन्यापासून टँकरने पुरवठा केला जात आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात काळखेडे येथे टँकर सुरू झाले आहे. आठ गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ८ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीतील टंचाई कक्षातून देण्यात आली.
वाकोद, जांभूळ, एकुलती बुद्रुक, एकुलती खुर्द या गावांनी टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली असून, प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम म्हणून तालुक्यातील धरणे, तलाव, बंधारे कोरडेठाक पडू लागले तर विहिरींनीही तळ गाठणे सुरू केले आहे.
तोंडापूर मध्यम प्रकल्पातून शेतकऱ्यांकडून पिकांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची उचल होत आहे. याकडे पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. या प्रकल्पातून अजिंठा लेणीसह तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा केला जातो. शिवाय तालुक्यात बहुतांश गावांमध्ये पाणीपुरवठा योजना येऊन कागदोपत्री तरी त्या सर्वच पूर्ण झाल्याचे दिसते. मात्र प्रत्यक्षात अशाच काही गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागते हे येथे उल्लेखनीय म्हणावे लागेल.
संभाव्य टंचाईग्रस्त गावे
जामनेर तालुक्यातील नेरी दिगर, ढालगाव, वडगाव सहो, कसबा पिंपरी, किन्ही, नाचणखेडे, लाखोली, काळखेडे, शंकरपुरा, शेळगाव, सोनारी, वाडी, एकुलती बुद्रुक, एकुलती खुर्द, जळांदी, ओझर बुद्रुक, करमाड आदी गावांना मे व जून महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.