जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२४ । शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केलीय. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, असे पाकिस्तान आणि काँग्रेसला वाटते. काँग्रेसने कायम मतांचे राजकारण केले. भांडण लावून लोकांना येडं बनवलं. विरोधी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे ‘मुंगेरीलाल’च अधिक आहेत, असा टोला गुलाबराव पाटीलांनी लगावला.
मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी चिंचवडच्या चिंचवडे लॉन्स येथे खान्देशवासीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत शेरोशायरी करीत विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला.
ते म्हणाले की, मोदी पंतप्रधान होऊ नयेत, असे फक्त पाकिस्तानला आणि देशातील भ्रष्टाचाऱ्यांना वाटते. पण देशातील सर्वसामान्य जनतेला मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे वाटते. त्यामुळे मोदींना दणादण मतदान करा, आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल, ही मोदींची गॅरंटी आहे. ज्यांच्याकडे 5-10 खासदारही नाहीत, ते इंडिया आघाडीतील नेतेही पंतप्रधान झाल्याचे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पहात आहेत, अशी खिल्ली गुलाबराव पाटील यांनी उडवली.
आम्ही रक्ताचं पाणी करून, जीवावर उदार होऊन पक्ष वाढवला, पण ते विनाकारण आम्हालाच बदनाम करीत आहेत. गद्दार, गद्दार म्हणून हिणवत आहेत, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. संजय राऊत यांनी पक्षाचा सत्यानाश केला, असा आरोपही त्यांनी केला.