जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२४ । राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी आणि शाहांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे आमदार-खासदार हे भाजपच्या जीवावर निवडून आले, आम्ही नसतो तर 15 आमदार तरी उद्धव ठाकरेंना निवडून आणता आले असते का? असा सवाल त्यांनी केला आहे
नेमकं काय म्हणाले महाजन?
उद्धव ठाकरे किती वर्ष आमच्या सोबत होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंना सर्व गोड वाटलं का? ज्यावेळी सोबत होते त्यावेळी उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदींचे कौतुक करत होते. आता विरोधात गेले म्हणून काहीही बोलावं का? आमच्या भरवशावरच तुमच्या 18 जागा निवडून आल्या. शिवसेनेचे खासदार, आमदार कुणाच्या भरशावर निवडून आले होते? आम्ही नसतो तर 15 आमदार तरी उद्धव ठाकरे यांना निवडून आणता आले असते का? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं, असं महाजन म्हणाले.
दरम्यान, यावेळी मंत्री महाजन यांनी शरद पवार यांच्यासह त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्यावरही टोला लगावला आहे. ते म्हणाले की, कधी पावसात भिजायचं, कधी रडायचं, कधी आजारी पडायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. शरद पवारांची तब्येत खराब असते, त्यांच्या तब्येतीवर बोलणं उचित होणार नाही. मात्र रोहित पवार हे थोडं काही झालं की लगेच रडायला लागतात. मला वाटतं रडून निवडणुका लढता किंवा जिंकता येत नाहीत. तुम्ही फार वेळ मतदारांना भावनिक करू शकणार नाहीत. मला असं वाटतं की त्यांनी मुद्द्यावर बोलावं, विकासावर बोला कामावर बोलावं आणि त्यावर मत मागावी.
संजय राऊतांच्या जिभेला कुठलेही हाड नाही…
गिरीश महाजन म्हणाले की, “संजय राऊत यांच्या जिभेला कुठलेही हाड नाही. कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही असं संजय राऊत बोलतात. संजय राऊत यांच्या बोलण्याला आता मी महत्त्व देत नाही. जनता ही संजय राऊत यांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही.”