जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२४ । मुंबईत गुजरातच्या एका कंपनीने मराठी माणसाला नोकरी नाकारल्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. यावरून नेत्यांसह सामान्य मराठी माणसाकडून रोष व्यक्त केला जात असून अशातच आता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कोणाचा माईका लाल मराठी माणसाला नोकरी नाकारू शकत नाही, असे पाटील यांनी म्हटले.
दरम्यान, जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराला वेग आला असून जळगाव ग्रामीण मतदार संघ हा आमचा बालेकिल्ला आहे, तो आबाधित ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी, पत्रकारांनी मुंबईतील नोकरीच्या जाहिरातीसंदर्भात प्रश्न विचारल होता. त्यावरही, त्यांनी गुलाबराव पाटीलस्टाईल प्रतिक्रिया दिली आहे.
”मुंबईत मराठी माणसाला नोकरी देणार नाही, असा कोणी माईचा लाल नाही. मुंबईत 80 टक्के नोकरीचा अधिकार पहिले स्थानिकांना असतो”, असे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी ईव्हीएम मशीनबद्दल केलेल्या वक्तव्यावरही मंत्री पाटीलांनी प्रतिक्रिया दिली. करण पवार आता बोलत आहे, मात्र ईव्हीएम मशीन हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलं असून हा त्यांचा रडीचा डाव आहे असं पाटील म्हणाले.
राऊतांवर टीका, उद्धव ठाकरेंवर प्रतिक्रिया
गुजरातच्या चोरांनी शिवसेना फोडण्याच्या प्रयत्न केल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, संजय राऊत ही वाया गेलेली केस आहे, असे म्हटले. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी वर टीका करताना म्हटले होते की नरेंद्र मोदी हे दुर्दैवी पंतप्रधान आहेत. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे. हे त्यांचं व्यक्तिगत मत असून लोकांनी मान्य केलेल्या व्यक्तीच्या बाबतीत, असे बोलणे उचित नाही, असे पाटील यांनी म्हटले.