जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२४ । जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानात गेल्या काही दिवसापासून वाढ होताना दिसत असून यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी तापमानाने उच्चांक गाठत ४३.६ अंशांची नोंद झाली. त्यात आता आगामी चार दिवस तापमानात अजून वाढ होण्याचा अंदाज असून, पारा ४३ ते ४४ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यात कोरडे वातावरण राहणार असल्याने उन्हाच्या झळा अधिक बसणार आहेत.
यंदाच्या उन्हाळ्यात मार्च महिन्यात पारा फारसा काही वाढला नव्हता. मात्र, एप्रिल महिन्यात पारा ४० अंशांच्या पुढेच राहिला होता. आता मे महिन्यात जळगावकरांना ‘मे हीट’चा तडाखा सहन करावा लागणार आहे. एप्रिल महिन्यात काहीअंशी ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरणात बाष्पाचे प्रमाण कायम होते. मात्र, मे महिन्यात वातावरण पूर्णपणे कोरडेच असल्याने, उष्णतेच्या झळा अधिक बसणार आहेत. यातच अजून चार दिवस तापमानाचा पारा जास्त राहणार असल्याने आगामी चार दिवस दुपारच्या वेळेस घराबाहेर निघणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
१० मे नंतर मान्सूनपूर्व पाऊस…
दरम्यान, सध्या जळगावात सूर्य आग ओकत असल्याने उष्णतेमुळे जळगावकर अक्षरक्ष:होरपळून निघत आहे. आगामी तीन चार दिवस उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळण्याची चिन्हे कमी आहे. ९ मे पर्यंत जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंशांपर्यंत राहू शकतो. मात्र, त्यानंतर १० मे नंतर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. सलग काही दिवस तापमानाचा पारा वाढल्यानंतर समुद्रावरील पाणी तापते, यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते व पावसाची स्थिती निर्माण होते. जिल्ह्यात १० मे ते १४ मे दरम्यान काहीअंशी पाऊस होऊ शकतो. तसेच ढगाळ वातावरणदेखील कायम राहण्याचा अंदाज आहे. यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो.
आगामी पाच दिवस कसं राहणार वातावरण :
६ मे रोजी कमाल तापमान ४३ अंश, तर वातावरण कोरडे राहील
७ मे रोजी कमाल तापमान ४३ अंश तर वातावरण कोरडे राहील
८ मे रोजी कमाल तापमान ४२ अंश तर वातावरण कोरडे राहील तसेच वेगवान वारे वाहणार
९ मे रोजी कमाल तापमान ४३ अंश तर वातावरण कोरडे राहील
१० मे रोजी कमाल तापमान ४३ अंश तर वातावरण काहीअंशी ढगाळ राहील