जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२४ । ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, मलाही तुमच्या मुलीसारखं सांभाळून घ्या, सुप्रिया यांच्यासारखंच माझ्यावरही प्रेम करा, असं आवाहनच रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांना केलं आहे.
रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी शुक्रवारी रावेरात जाहीर सभा घेतली. या जाहीरसभेत रोहिणी खडसे बोलत होत्या. यावेळी बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, माझे वडील भाजपमध्ये गेले तरी मला पक्षात थांबायचं आहे. तुमचा आदेश आणि सूचना असेल तर आपल्याच पक्षात थांबण्याची माझी इच्छा आहे. कारण मला या पक्षाची विचारधारा आवडते. पक्षाचं नेतृत्व आवडतं आणि नेतृत्वात असलेली जिद्द आवडते. सुप्रिया सुळे जशी तुमची कन्या आहे. तसंच मलाही मुलगी समजून सांभाळून घ्या. सुप्रिया यांच्यासारखंच माझ्यावरही प्रेम करा, असं रोहिणी खडसे म्हणाल्या केलं.
रावेर लोकसभेच्या पक्षाच्या उमेदवाराला लीड देण्याचं काम मी करेल. तुतारी चिन्हाला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणायचं आहे. आपले उमेदवार संसदेत पाठवायचे आहेत. पवार साहेबांनी राज्यातील वातावरण फिरवलं आहे. त्यामुळे विजय आपलाच होणार आहे, असं सांगतानाच जिल्हा बँकेत कर्जासाठी शेतकऱ्यांना वणवण फिरावं लागत आहे, त्यांनाही न्याय द्यायचा आहे, असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
दरम्यान, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी रोहिणी खडसे यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मला आठवतं नाथाभाऊ खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी पवार साहेबांच्या समोर रोहिणी यांनी सांगितलं की, नाथाभाऊंना कुठे जायचं तिकडे जाऊ दे, पण पवार साहेब मी तुमच्याच नेतृत्वाखाली काम करणार आहे. काही झालं तरी मी तुमच्यासाठी काम करणार आहे. उद्याच्या विधानसभेला देखील रोहिणीताई या आपल्या पक्षाच्या उमेदवार म्हणून इथे उभा राहणार आहेत. त्यांच्या मागे देखील तुम्हाला सगळ्यांना ताकदीन उभे राहावे लागेल, असं जयंत पाटील म्हणाले.